बिभव कुमारला सशर्थ जामीन मंजूर
मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यास ‘सर्वोच्च’कडून मनाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील कथित हल्लाप्रकरणी अटकेत असलेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा निकटवर्तीय बिभव कुमार याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी 18 मे रोजी त्याला केजरीवाल यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर बिभव कुमारच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.
बिभव कुमारला जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार या खटल्यातील सर्व प्रमुख साक्षीदार तपासले जाईपर्यंत बिभव कुमारला मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून काम करण्यास किंवा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच सदर खटल्यासंबंधी जाहीरपणे बोलण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायालयाने सत्र न्यायालयाला 3 आठवड्यांच्या आत प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले असून बिभव कुमारला कोणतेही अधिकृत पद धारण करण्यास मनाई केली आहे.