भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात सर्प, मगरींसाठी विभाग
वनमंत्री खंड्रे यांची माहिती; कामाची केली पाहणी
बेळगाव : भुतरामट्टीतील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालात सर्प व मगरींसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येत असल्याची माहिती वन व जीवशास्त्र-पर्यावरणमंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिली. मंत्री खंड्रे यांनी शुक्रवारी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन सर्पांसाठी बांधण्यात येत असलेल्या विभागाची पाहणी केली. त्यानंतर ते म्हणाले की, 50 लाख रु. खर्चातून मगरींसाठी विभाग व 40.8 लाख रु. खर्चातून सर्पांसाठी विभाग तयार करण्यात येत आहे. लवकरच 2 मगरी व नागसर्प किंग कोब्रा यासारख्या 12 सापांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना वन्यजीव व प्राणी संग्रहालयाची सचित्र माहिती देण्यासाठी चित्रमंदिर उभारण्यात आले असून, त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येईल.
प्राणी संग्रहालयाकडे ओढा वाढेल
प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्यांना वाहने पार्किंगसाठी भव्य पटांगण, वीरराणी कित्तूर चन्नम्मा पुतळा उभारणे आदी कामे 5.85 कोटी रु. खर्चातून हाती घेण्यात आली आहेत. ही कामे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होतील. पक्ष्यांच्या विभागात पारदर्शक काचा बसविण्यात आल्या असून, पक्षी पाहणे व फोटो घेण्यास अनुकूल करून देण्यात आले आहे. यामुळे पुढील दिवसांत पर्यटकांचा प्राणी संग्रहालयाकडे ओढा वाढेल, असा विश्वासही मंत्री खंड्रे यांनी व्यक्त केला.