For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान

06:58 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान
Advertisement

राजेंच्या हस्ते ‘ऑर्डर ऑफ ड्रुक ग्याल्पो’ पुरस्कार प्रदान : ‘गार्ड ऑफ ऑनर’ने भव्य स्वागत

Advertisement

वृत्तसंस्था/ थिंफू

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. भूतानमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पारो विमानतळावर मोदींचे आलिंगन देत स्वागत केले. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. तसेच भूतानचे राजे जिग्मे वांगचुक यांनी पंतप्रधानांना सर्वोच्च ‘ऑर्डर ऑफ ड्रुक ग्याल्पो’ पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर पंतप्रधानांनी आपण हा सन्मान 140 कोटी भारतीयांना समर्पित करत असल्याचे स्पष्ट केले.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भूतान दौरा शुक्रवारपासून प्रारंभ झाला. या दोन दिवशीय दौऱ्यात त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी ते राजधानी थिम्पू येथील ताशिचो जोंग पॅलेसमध्ये पोहोचले. येथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. त्यांनी भूतानचे राजा जिग्मे वांगचुक यांची भेट घेतली. या भेटीत द्वयींमध्ये काही मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. आता पुढील दोन दिवस ते विविध द्विस्तरीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या बैठकांमध्ये सहभागी होतील.

 

भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले. एक भारतीय म्हणून माझ्या आयुष्यातील आजचा दिवस खूप मोठा आहे. तुम्ही मला भूतानचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. प्रत्येक पुरस्कार स्वत:मध्ये खास असतो, पण जेव्हा मला दुसऱ्या देशाकडून पुरस्कार मिळतो तेव्हा ते विशेष असते, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

भारत आणि भूतान यांचा समान वारसा आहे. भारत ही भगवान बुद्धांची भूमी आहे, त्यांचे तपश्चर्येचे निवासस्थान आहे. भारत ही भूमी आहे जिथे बुद्धांना ज्ञान प्राप्त झाले. भूतानने भगवान बुद्धांच्या शिकवणी आत्मसात केल्या आणि त्यांचे जतन केले. भारत आणि भूतानमधील भागिदारी केवळ जमीन आणि पाण्यापुरती मर्यादित नाही. भूतान आता भारताच्या अंतराळ मोहिमेत भागीदार आहे. भूतानच्या शास्त्रज्ञांनी इस्रोच्या सहकार्याने उपग्रह प्रक्षेपित केला आहे. आम्ही वेगवेगळ्या पातळीवर एकमेकांचे यश साजरे करतो, असे मोदी पुढे म्हणाले.

विद्यार्थ्यांकडून मोदींचे स्वागत

मोदींच्या स्वागतासाठी भूतानमध्ये शुक्रवारी सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यांचे स्वागत करण्यासाठी विद्यार्थी एक्स्प्रेस हायवेवर शिस्तबद्धरित्या सज्ज होते. मोदींच्या या दौऱ्यापूर्वी भूतानचे पंतप्रधान तोबगे 5 दिवसांसाठी भारतात आले होते. जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. या भेटीदरम्यान तोबगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींना भूतान भेटीचे निमंत्रण दिले होते. मोदींनीही त्यांचे निमंत्रण स्वीकारत भूतान दौऱ्याला प्रारंभ केला आहे. भारतातील सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर परदेश दौऱ्यावर जाणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. निवडणुकीपूर्वी भूतानला भेट देऊन मोदींनी शेजारील देशाला त्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement
Tags :

.