For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भुजबळ निसटले पण महायुती अडकली!

06:40 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
भुजबळ निसटले पण महायुती अडकली
Advertisement

Advertisement

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची पसंती असतानाही तीन आठवडे उमेदवारी जाहीर होत नाही. आता नाशिक लढवणे अवघड आहे, असे म्हणत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्वत:ची सन्मानजनक सुटका करून घेतली. मात्र ‘माधव’ फॉर्मुल्याला पुन्हा हवा देणारी आणि पवार-ठाकरे यांना त्यांच्याच माणसांशी झुंजायला लावणारी खेळी अडचणीत आली आहे. एका अर्थाने या सापळ्यातून भुजबळ निसटले पण महायुती अडकली!

एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आंदोलन मागे घेतले जात असताना नाशिकमधून छगन भुजबळ, परभणीमधून महादेव जानकर आणि बीडमधून पंकजा मुंडे यांना लोकसभेला उमेदवारी देऊन भाजपने पुन्हा एकदा ‘माधव’ फॉर्मुल्याद्वारे माळी, धनगर, वंजारी या लोकप्रिय आणि मतवर्षाव करणाऱ्या प्रयत्नाला चुचकारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तीन पक्षांचा जागा वाटपाचा तंटा पहिल्या टप्प्यातील मतदान झाले तरी संपला नाही. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदार संघातून मी माघार घेत असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी जाहीर केले.

Advertisement

उमेदवारी जाहीर होण्यास खुपच उशीर होत आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन, महायुतीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपण पूर्णपणे माघार घेत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. माझ्यावर विश्वास ठेवून माझे नाव, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सुचवल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनापासून आभार मानतो असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भुजबळांच्या या भूमिकेमुळे महायुतीत खळबळ माजणे स्वाभाविक आहे. पण शिंदेसेनेचे इच्छुक उमेदवार आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी भुजबळांच्या जखमेवर मीठ चोळत त्यांचे आभार मानले.

आता तरी आपली उमेदवारी तात्काळ जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांचे किती पटते ते उघड झाले. भुजबळ यांचा निर्णय रोखून धरणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच ही परिस्थिती तातडीने हाताळावी लागणार आहे. त्यांच्याच रुसव्यामुळे आणि शेवटच्या क्षणी कमालीचे आग्रही झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून भुजबळ लढले नाहीत तर आता महायुतीला ओबीसी मतांचा फटकाही जाणवू शकतो.

यानिमित्ताने भुजबळ यांच्याकडून काही गौप्यस्फोट करण्यात आले. महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली होती. त्यावेळी अजित पवार यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची मागणी केली. येथून समीर भुजबळ लढतील असे अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, तेथून छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी असाच शहा यांचा आग्रह होता.

पण राज्यातील नेत्यांचे ठरत नव्हते. आम्हाला माध्यमांना दिल्लीत काय ठरले, हे सांगताही येत नव्हते. असे सांगून भुजबळ यांनी फडणवीस यांच्याकडे समीर भुजबळ यांना उमेदवारी द्या अशी मागणी केली. तेव्हाही त्यांनी समीर नव्हे तर तुम्हीच लढायचे ठरले आहे असे सांगितले असल्याचेही भुजबळ यांनी जाहीर केले. महायुतीमध्ये सर्व ठरले असेल तर ती जागा जाहीर करायला हवी, आता तीन आठवडे संपले असले तरी निर्णय नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होऊन प्रचार देखील सुरू झाला. आता खूप वेळ झाला असल्याने आपणच आपले नाव मागे घेत असल्याची घोषणा भुजबळ यांनी केली.

या घोषणेमागे खूपच स्फोट दडलेले आहेत. आपल्या नावाचा विचार केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान आणि अमित शहा यांचे आभार मानले असले तरी राज्यातील नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. राज्यात मोदी, शहा यांच्या निर्णयाप्रमाणे झाले नसल्याकडे अंगुली निर्देश केला आहे. पण एवढ्यावरच हे थांबलेले नाही. शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी तातडीने आपली उमेदवारी जाहीर करण्याची मागणी करणे हा प्रतिहल्लाच आहे. आपण सातत्याने उमेदवारी मागत होतो. तेव्हा शिंदे यांनी तुम्हालाच उमेदवारी मिळेल, प्रचारात राहा असे सांगितले होते. त्यानुसार उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी केली आहे.

अर्थातच नाशिक मतदारसंघ सोडण्यास शिंदे यांचा विरोध होता. तो केवळ त्या मतदारसंघापुरता नव्हता. हेमंत पाटील, भावना गवळी यांना आधीच गप्प बसवले होते. कोल्हापूर जिह्यातून संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांची जागा कशीतरी टिकवली होती. ठाणे, कल्याण, नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईसाठी शिंदे यांची रस्सिखेच सुरू होती. अखेर शिंदे यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केल्याने निर्णय लागत नव्हता. गुरुवारी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचा निर्णय लागला आणि नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, आपला निर्णय झाला नाही या संतापातून भुजबळ यांनी सगळे पत्ते खुले केले. रत्नागिरीचा निर्णय होतो, मात्र आपला होत नाही हे भुजबळ यांना खटकले असावे हे स्पष्टच आहे. प्रदीर्घकाळ ठाकरे आणि पवारांचा सहवास लाभलेल्या भुजबळ आणि गुरूंचे काही डाव इथे वापरण्यास सुरुवात केली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आता त्यांना या कृतीसाठी कोण हवा देत आहे, हे महायुतीला शोधावे लागणार आहे.

पण या निमित्ताने मोदी यांच्याही मनात काय आहे ते उघड झाले आहे. त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेला सोडून गेलेल्या नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्यासह दिग्गजांना शिवसेनेच्या तर अजित पवारांसह दिग्गजांना शरद पवारांच्याबरोबर लढण्यात गुंतवायचे आहे. अधिक राज ठाकरेंनाही उतरवल्याने तसे ते गुंतलेतही. पण, महायुतीतील बेबनावाने ठाकरे, पवारांचे काम हलके झाले आहे. भाजपने आपले पूर्वीचे होते त्याहून अधिक मतदारसंघ या निमित्ताने लढायचे ठरवले असून उर्वरित दोन पक्षांना विविध कारणाने तिकीट नाकारण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचा खूप वाईट संदेश गेला आहे.

विधानसभेपर्यंत महायुती टिकून रहावी अशी मी प्रार्थना करतो कारण लोकसभेनंतर महाराष्ट्रात काहीही घडामोडी घडू शकतात... हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार सुनील शेळके यांचे मत आणि माजी मंत्री सुरेश नवले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपने अभिमन्यू केला.

आता त्यांची सुटका होणे अवघड आहे असे म्हणून खदखद व्यक्त केली आहे. शिवाय एकनाथ शिंदे हतबल झाल्याचीही त्यांनी टीका केली आहे. या घडामोडी आणि पाठोपाठ भुजबळ यांनी दिलेला दणका विचार करायला लावणारा आहे.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.