For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शंभर खाटांच्या दवाखान्याचे आज भूमिपूजन

10:35 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
शंभर खाटांच्या दवाखान्याचे आज भूमिपूजन
Advertisement

आरोग्य मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती : तालुकास्तरीय दवाखान्यात सर्व सुविधा उपलब्ध होणार

Advertisement

खानापूर : शहरात तालुकास्तरीय शंभर खाटांच्या दवाखान्याचा भूमिपूजन समारंभ बुधवार दि. 11 रोजी आरोग्य मंत्री दिनेश गुंडुराव, पालक मंत्री सतिश जारकीहोळी, खासदार विश्वेश्वर हेगडे, महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काळात तालुक्यातील रुग्णांना सर्व सेवा या दवाखान्यात उपलब्ध होणार आहेत. शहरात  70 वर्षापूर्वी शासकीय दवाखाना सुरू करण्यात आला होता. यावेळी लहान दगडी इमारत उभारण्यात आली होती. आजही ती अस्तित्वात आहे. आता शंभर खाटांचा दवाखाना उभारण्यात येणार असून यासाठी दवाखान्याची जुनी इमारत पूर्णपणे पाडवून त्या जागी नवीन तीन मजली इमारत उभारण्यात येणार आहे.

सध्याच्या शिवस्मारक चौकाला लागून असलेल्या जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र हे 70 वर्षापूर्वी उभारण्यात आले होते. त्यावेळी ही इमारत खानापूर शहरापासून दूरवर होती. या ठिकाणी गर्द झाडी आणि जंगलसदृष्य झुडपे असल्याने या ठिकाणी कोणी येण्यासही भीत होते. तसेच खानापूर, नंदगड, गोवा राज्यासाठी जाणारा रस्ताही शहराच्या बाहेरुन जुन्या पुलावरुन जात होता. त्यामुळे दवाखाना, पोस्ट कार्यालय, रेल्वेस्थानकही शहरापासून दूरवर वाटत होती. मात्र कालांतराने शहराचे विस्तारीकरण झाल्याने तसेच बेळगाव-गोवा-हल्याळ नवा रस्ता तयार झाल्याने शहराचे विस्तारीकरण होण्यास सुरुवात झाली. संपूर्ण शासकीय कार्यालय, बँका नव्या रस्त्याच्या बाजूने तयार झाली. त्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलून गेलेला आहे.

Advertisement

सध्या असलेला शासकीय दवाखान्याचा वेळोवेळी विस्तार होत 50 खाटांचा करण्यात आला आहे. त्यानंतर नव्या योजनेंतर्गत दवाखान्याचे विस्तारीकरण करण्यात आले आहे. नाबार्ड आणि केंद्रीय आरोग्य खात्याच्या निर्देशानुसार तालुकास्तरीय शंभर खाटांच्या दवाखान्याचा पाठपुरावा गेल्या काहीवर्षापासून करण्यात येत होता. त्याला अंजली निंबाळकर यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली आहे. तसेच शिशू, माता 60 खाटांचा दवाखान्याचेही बांधकाम पूर्ण झाले आहे. याचे उद्घाटन आज होणार आहे. त्यामुळे बाळ आणि बाळंतिणीची चांगली सोय होणार आहे.

35 कोटीचा निधी मंजूर

नव्याने उभारण्यात येणाऱ्या शंभर खाटांच्या दवाखान्यासाठी 35 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. सध्या अस्तित्वात असलेली जुन्या दवाखान्याची इमारत पूर्णपणे पाडवून जागा सपाटीकरण करून या ठिकाणी तीन मजली नवीन अद्ययावत इमारत उभारण्यात येणार आहे. या दवाखान्यात सर्व रोगावरील तज्ञ डॉक्टर नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच तातडीच्या सेवा देखील उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे खानापूर शहरासह तालुक्यातील नागरिकांना अत्याधुनिक सेवा या दवाखान्यात उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे साध्या उपचारासाठी बेळगावला रुग्णांना पाठवणे आता बंद होणार आहे. तालुक्यातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार

गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत असलेल्या अत्याधुनिक दवाखान्याची मागणी पूर्ण होणार असल्याने जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दवाखान्यात रुग्णांची संख्या पाहता शंभर खाटांच्या दवाखान्याची गरज होती. ती आता पूर्ण होणार आहे. मात्र तालुक्याच्या विस्ताराचा आणि जनसंख्येचा विचार करता नव्याने होत असलेला शंभर खाटांचा दवाखान्याचा विस्तारही वाढविणे गरजेचे आहे. तसेच नंदगड, गणेबैल, कणकुंबी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे विस्तारीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच या ठिकाणी चांगले डॉक्टर नियुक्त करणे गरजेचे आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या दवाखान्याबाबत शासनदरबारी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. या दवाखान्याचे विस्तारीकरण झाल्यास तसेच त्या ठिकाणी चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यास त्या त्या ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

Advertisement
Tags :

.