For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भोळा शंकर

06:40 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
भोळा शंकर
Advertisement

श्रीमद भागवतमध्ये परीक्षित महाराज एक  प्रश्न विचारतात (भा 10.88.1) श्रीराजोवाच-  देवासुरमनुष्येषु ये भजन्त्यशिवं शिवम् । प्रायस्ते धनिनो भोजा न तु लष्म्या: पतिं हरिम् अर्थात ‘जे देव, असुर आणि मनुष्य कठोर तपस्वी अशा भगवान शंकराची उपासना करतात, ते सामान्यत: धनवान आणि विषयभोगी होतात, परंतु लक्ष्मीपती श्रीहरीची उपासना करणाऱ्यांना वैभव प्राप्त होत नाही.’ हे असे का होते, याविषयी आमच्या मनात मोठा संशय निर्माण झाला असल्यामुळे आम्ही वस्तुस्थिती जाणून घेऊ इच्छितो. भगवान विष्णू आणि शंकर या परस्परविऊद्ध स्वभावांच्या प्रभूंची उपासना करणाऱ्या साधकांना अपेक्षांविऊद्ध अशी  स्थिती का प्राप्त व्हावी?

Advertisement

उत्तरादाखल शुकदेव गोस्वामी म्हणाले-भगवान शंकर भौतिक प्रकृतीरूपी व्यक्तिगत शक्तीने नित्य युक्त असतात. ते प्रकृतीच्या तीन गुणांना अनुसरून स्वत:ला तीन श्रेणीमध्ये प्रकट करतात आणि सत्वगुणी अहंकार (वैकारिक) रजोगुणी अहंकार (तेजस) आणि तमोगुणी अहंकार (तामस) अशी रूपे धारण करतात. या मिथ्या अहंकाराचे विकार म्हणून सोळा घटक निर्माण झालेले आहेत. भगवान शंकर विविध देवांची रूपे धारण करून या सोळा विकारांमध्ये स्वत:ला प्रकट करतात आणि त्यांचा भक्त जेव्हा या विकारांच्या अधिष्ठात्या देवांपैकी ज्या देवाची उपासना करतो, तेव्हा त्या विकाराला अनुसरून अशी सर्व प्रकारची उपभोग्य ऐश्वर्ये त्याला प्राप्त होतात. तथापि, भगवान श्रीहरिंचा प्राकृतिक गुणांशी मुळीच संबंध नाही. ते पुऊषजात्तम, सर्व काही पाहणारे शाश्वत साक्षी आणि भौतिक प्रकृतीच्या पलीकडे आहेत. त्यांची भक्ती करणारा मनुष्यही त्यांच्याप्रमाणेच त्रिगुणातीत होतो.

याबद्दल भगवान श्रीकृष्ण म्हणतात (10.88.13), माझी आराधना करणे कठीण असल्यामुळे लोक सामान्यत: मला टाळून सहजपणे प्रसन्न होणाऱ्या अन्य देवतांची उपासना करू लागतात. अशा उपासकांना देवीदेवतांकडून राजऐश्वर्य प्राप्त होताच ते उद्धट, मदोन्मत्त आणि आपल्या कर्तव्यांची उपेक्षा करणारे असे होऊन जातात. मग, ते वर देणाऱ्या देवांचाही अपमान करण्याचे धाडस करण्यास मागेपुढे पहात नाहीत.

Advertisement

पुढे शुकदेव गोस्वामी म्हणतात-भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू, भगवान शंकर आणि इतर देवता मनुष्याला शाप किंवा वरदानही देण्यास समर्थ आहेत. हे परीक्षित महाराज, शंकर आणि ब्रह्मदेव तात्काळ शाप किंवा वरदान देतात, पण भगवान विष्णूंचे मात्र तसे नाही.

भगवान शंकरांनी वृक नावाच्या असुराला वरदान देऊन स्वत:वरच संकट कसे ओढवून घेतले, या संदर्भात एक प्राचीन ऐतिहासिक प्रसंग सांगितला जातो. शकुनीचा पुत्र वृकासूर नावाने ओळखला जात होता. तो दुष्ट बुद्धीचा होता. एकदा वाटेत त्याची नारद मुनींशी भेट झाली तेव्हा त्याने नारदांना प्रŽ विचारला “ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर या तीन देवांमधील कोणता देव त्वरित आणि सहजपणे संतुष्ट होणार आहे?” नारद त्याला म्हणाले-तू भगवान शंकराची उपासना कर म्हणजे तुला लवकरच यशप्राप्ती होईल. ते उपासकांच्या अत्यल्प गुणांनी त्वरित संतुष्ट होतात आणि त्यांचे अल्पसे दोष पाहून त्वरित कृद्धही होतात. दशानन रावण आणि बाणासुर या दोघांनीही भाटांप्रमाणेच जेव्हा शंकराची  स्तुती केली, तेव्हा ते त्या दोघांवरही संतुष्ट झाले. त्यामुळे त्यांनी दोघांनाही अतुलनीय सामर्थ्य प्रदान केले व त्यायोगे स्वत:वर मोठे संकटही ओढवून घेतले.

नारदांकडून उपदेश मिळालेला तो वृकासूर भगवान शंकराची उपासना करण्याकरिता केदारनाथ क्षेत्री गेला. अग्नी हे शंकराचे मुख होय. यास्तव वृकासुराने स्वत:च्या अवयवांचे मांस तोडून अग्निमध्ये त्याच्या आहुती अर्पण काण्यास प्रारंभ केला.  अशा रीतीने सहा दिवस हवन करूनही भगवान शंकराचे दर्शन काही झाले नाही. तेव्हा निराश झालेल्या वृकासुराने सातव्या दिवशी तेथील पाण्यामध्ये स्नान करून आपले मस्तकावरील केस भिजविले आणि आता तो एका परशुने आपले मस्तक तोडून टाकण्यास सिद्ध झाला. तथापि, अगदी त्याच क्षणी परम दयाळू आणि अग्निसमान तेजस्वी असे भगवान शंकर यज्ञाग्नीतून प्रकट झाले. त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी वृकासुराचे हात धरले आणि त्याला आपले मस्तक कापू दिले नाही. भगवान शंकरांच्या केवळ स्पर्शामुळेच त्याचे शरीर पूर्वीप्रमाणे व्यवस्थित आणि सुदृढ झाले.

भगवान शंकर वृकासुराला म्हणाले-अरे मित्रा, असले धाडस पुरे कर, अगदी पुरे कर. मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. हवा तो वर माग मी देईन. मनुष्याने शरण येऊन मला जरी नुसते पाणी अर्पण केले, तरी तेवढ्यानेही मी संतुष्ट होतो. अरे, तू आपल्या शरीराला अकारण मोठी पीडा दिली आहेस.

त्यानंतर पापी वृकासुराने सर्व प्राणिमात्रांमध्ये भय उत्पन्न करणारा वर शंकराकडे मागितला. तो म्हणाला, “मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन, तो तो प्राणी मरून जावा असा वर मला द्या.” वृकासूराची ही मागणी ऐकून भगवान शंकराचे मन खिन्न झाले. तथापि, त्यांनी हसून आणि ॐकाराचे उच्चारण करून त्याला इष्ट वरदान दिले. असे वरदान मात्र सापाला दूध पाजण्यासारखे होते.

भगवान शंकरानी दिलेल्या वराची परीक्षा करण्यासाठी म्हणून दुष्ट वृकासुराने आपला हात भगवान शंकराच्या मस्तकावर ठेवण्याचा प्रयत्न केला. परिणामी, आपण केलेली चुकीची कृती लक्षात येताच भगवान शिव भयभीत झाले.

वृकासूर मागे लागून पिडत असल्यामुळे भयभीत झालेले आणि थरथर कापणारे शंकर आपले उत्तरेकडील निवासस्थान सोडून वेगाने पळू लागले. ते पृथ्वी, आकाश आणि दिशा यांच्या सीमांपर्यंत पळत गेले. श्रेष्ठ देवांना या वराचा प्रतिकार कसा करावा हे जाणता आले नाही आणि म्हणून ते काही करू शकले नाहीत. भगवान शंकर अंधकाराच्या पलीकडील आणि तेज:पुंज अशा वैकुंठास पोहोचले. तेथे भगवान नारायणांचा शाश्वत निवास असतो.

भक्तांचे दु:ख दूर करणाऱ्या भगवान विष्णूंनी संकटात सापडलेले शंकर आपल्याकडे येत असल्याचे दुरूनच पहिले. तेव्हा, त्यांनी आपल्या योगमायेला मेखला, मृगचर्म, दंड तथा ऊद्राक्षाची माळ या लक्षणांनी युक्त असे ब्रह्मचारी बटूचे रूप धारण केले. ते आता वृकासूरासमोर प्रकट झाले. भगवंताचे तेज अग्निसमान प्रखर होते. हाती दर्भ घेतलेल्या भगवंतांनी नम्रपणे वृकासुराचे स्वागत केले. नंतर ते त्याला नमस्कार करून म्हणाले.-हे शकुनीपुत्र, तुम्ही खरोखर थकल्यासारखे दिसता. कोणत्या कारणासाठी तुम्ही इतक्मया दूर अंतरावरून येथे आला आहात? कृपया क्षणभरासाठी येथे विश्र्रांती घ्या. शेवटी, मनुष्याचा देहच त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. याप्रमाणे वृकासुराला श्रीकृष्णांनी भ्रमित केले. मग श्रीकृष्ण त्याला म्हणाले “आम्ही शंकरांच्या वचनावर मुळीच विश्वास ठेवीत नाही, आता त्या शंकराला जगद्गुऊ म्हणत असाल तर आणि तुमचा त्याच्यावर विश्वास असेल, तर प्रथम तुम्ही त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वत:च्या मस्तकावर त्वरित हात ठेवून तरी पहा काय होते.

अशा प्रकारे भगवंताचे मंत्रमुग्ध करणारे आणि आश्चर्यकारी भाषण ऐकून मूर्ख वृकासुराची बुद्धी भ्रमित झाली आणि आपण काय करीत आहोत याची जाणीव न होता त्याने आपलाच हात आपल्या मस्तकावर ठेवला. त्वरित जणू वज्राचा आघात व्हावा त्याप्रमाणे आघात होऊन त्याचे मस्तक फुटून गेले आणि तो तक्षणी

निष्प्राण होऊन भूमीवर पडला. पण संकटमुक्त झालेल्या शंकरांना पुऊषोत्तम भगवान नारायण म्हणाले “हे महादेव, जरा पहा! हा पापी असुर आपल्या पापानेच मरण पावला आहे. महान संतांचा अपराध केल्यावर कोणत्या प्राण्याचे कल्याण होणार बरे? तू तर विश्वाचा अधिपती आणि गुऊ आहेस. तुझा अपराध करणाऱ्याची काय गती होणार.?  असे हे श्रीकृष्ण आणि शंकराचे दिव्य संबंध आहेत.

                                                                         -वृंदावनदास

Advertisement
Tags :

.