'भोगावती'च्या अध्यक्षपदी प्रा. शिवाजीराव पाटील; उपाध्यक्षपदी राजाराम कवडे यांची निवड
भोगावती / प्रतिनिधी
शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी प्रा शिवाजीराव आनंदराव पाटील (रा देवाळे ता करवीर) व नूतन उपाध्यक्षपदी राजाराम शंकर कवडे (रा आवळी बु। ता राधानगरी) यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली.कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी गटाने २५ पैकी २४ जागा जिकून निर्विवाद सत्ता हस्तगत केली.तर विरोधी गटाला केवळ एक जागा मिळाली आहे.त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे निश्चित झाले होते.
भोगावतीचे मावळते अध्यक्ष व काँग्रेसचे आमदार पी.एन.पाटील सडोलीकर,शेकापक्षाचे माजी आमदार संपतराव पवार पाटील व युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष क्रांतिसिंह पवार पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील,गोकुळचे अध्यक्ष अरुण डोगळे,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील,गोकुळचे माजी संचालक पी.डी.धुंदरे यांच्या आघाडीने २५ पैकी २४ जागा जिंकून सता हस्तगत केली आहे. तर विरोधी आघाडीतून माजी अध्यक्ष धैर्यशिल पाटील कौलवकर एकमेव निवडून आले आहेत.नूतन संचालक मंडळात काँग्रेस १३,शेकापक्ष ५ व राष्ट्रवादीच्या ६ संचालकांचा समावेश आहे.कारखान्याचे राधानगरी व करवीर या दोन तालुक्यात कार्यक्षेत्र आहे.त्यामुळे नूतन अध्यक्ष पदाचा पहिला मान करवीर तालुक्याला मिळाला आहे.तर राधानगरी तालूक्याला उपाध्यक्ष पदाचा मान दिला आहे.
दरम्यान, नेतेमंडळींनी दिलेला पदाधिकारी निवडीचा बंद लखोटा गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे व मार्केट कमिटीचे सभापती भारत पाटील भुयेकर सभास्थळी घेऊन आले होते. निवडीनंतर नूतन अध्यक्ष प्रा शिवाजीराव पाटील व नूतन उपाध्यक्ष राजाराम कवडे यांचा अनुक्रमे निवडणूक अधिकारी निलकंठ करे व सहाय्यक निवडणूक अधिकारी मिलिंद ओतारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ नेते कृष्णराव किरुळकर,गोकुळचे माजी संचालक पी डी धुंदरे, विद्यमान संचालक प्रा किसनराव चौगले,मार्केट कमिटीचे संचालक शिवाजीराव पाटील,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील व सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले.सचिव उदय मोरे यांनी आभार मानले.