महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भावे ओवाळीन

06:40 AM Nov 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संध्याकाळ म्हणजे दिवे लागण्याची वेळ असे म्हणत पूर्वज स्त्रियांची लगबग चाले. घरोघरी वीज येण्यापूर्वी तेलातुपाच्या दिव्याच्या उजेडावर व्यवहारातील कामे चालत. तिन्ही सांजेपूर्वी छोट्या दिवलाण्या सज्ज असत. कंदील घासून-पुसून ठेवलेले असत. स्वत: प्रकाशून दुसऱ्यांना प्रकाश देणारा दीप भारतीय संस्कृतीमधले तेजाचे एक वैशिष्ट्यापूर्ण रूप आहे. संध्याकाळी आणि पहाटे घराघरात उजळणारा दीप शुभंकराचे प्रतीक आहे. न विझणारे, न मावळणारे विद्युतदीप अहोरात्र शहर उजळत असले तरी देवघरात प्रकाश देणारी इवलीशी पणती मनात पावित्र्य निर्माण करते. म्हणून भारतीय मन आजही तिची मनापासून पूजा करते.

Advertisement

संत ज्ञानोबा माऊली म्हणतात,

Advertisement

‘जैसी दीपकळीका धाकुटी ।

परी बहु तेजाते प्रकटी ।

तैसी सदबुद्धी हे थेकुटी । म्हणू नये?’ एखादी दीपज्योत लहानशी असली तरी पुष्कळ प्रकाश देते. त्याप्रमाणे सद्बुद्धी जरी लहान असली तरी तिला अल्प म्हणू नये कारण ती परमात्म्याच्या अस्तित्वाची खूण आहे. ती आयुष्यात आनंद भरते. ज्ञानेश्वर माऊलींचे बोट धरून जाणारी जात्यावरची ओवी अशी

आहे- ‘इवलीशी पणती प्रकाशा देतसे । इवलेसे पुण्य जीवा आधार होतसे?’ काळोख्या घनदाट अंधारात एखादा किरण तारून नेतो. समुद्रामध्ये लाटांवर स्वार होत एखादा ओंडकाही जगवतो. पू. डोंगरे महाराज म्हणत, ‘संध्याकाळ झाली की एखादी गृहिणी घरी एकुलतीएक असणारी पणती उजळून उंबरठ्यावर ठेवत असे. जेणेकरून तिचा प्रकाश थोडा आत व थोडा बाहेर पडेल. त्याप्रमाणे श्रीरामनामाची पणती उजळून जिभेवर ठेवावी. ती अंतर्मुख करीत आतला अंधकार नाहीसा करेल आणि तिचा थोडा प्रकाश बाहेरही पडेल. तो उजेडाचा झोत परिसर उजळेल.

भगवान परशुरामांचा जन्म ज्या ऋषीकुलात झाला त्या ऋषीकुलाचे आदिपुरुष भृगुमहर्षी हे सर्व ऋषीगणांमध्ये श्रेष्ठ म्हणून परिचित आहेत. भृगुऋषींनी अग्नीचे प्रज्वलन कसे करायचे ही विद्या शिकून अग्नीचे वास्तव्य काष्ठात घडवून आणले. अरणीतून घर्षणाने अग्नी निर्माण होतो हे पटवून दिले. शब्दांमध्येही अग्नी प्रकट करण्याचे सामर्थ्य असते हे सिद्ध केले. भृगुऋषींनी मानवाच्या स्वास्थ्यासाठी आणि कल्याणासाठी अग्नीची निर्मिती केली. भृगुमहर्षींचे जगतावर फार मोठे उपकार आहेत. दीपाच्या रूपाने अग्नीने मानवाला प्रकाश दिला.

दीप लावणे ही परंपरा शुभप्रसंगी आवर्जून पाळतात. दिवाळीचा आकाशदिवा, शुभकार्यात लामणदिवा, लग्नप्रसंगी शकुनदिवा, नंदादीप, कणकेचे दिवे म्हणजे पिष्टदीप हा शुभकार्याला साक्षी असतो म्हणून स्थापितदीप आणि संत सोहिरोबा म्हणतात तो अंतरीचा ज्ञानदिवा. हा दिवा हरिभजनाने तेवत राहतो. नामस्मरण हे आतल्या अग्नीला जागृत ठेवण्याचे महत्त्वाचे इंधन आहे. ज्ञानेश्वरीच्या आठव्या अध्यायात माऊली म्हणतात, ‘अगा देहीचा अग्नी जरी गेला, तरी देह नव्हे चिखलु ओला’. शरीरामधला अग्नी मंद झाला की प्राण क्षीण होतो. बुद्धी असून काहीही उपयोग होत नाही. अग्नी नष्ट झाला की प्राणाच्या क्रिया थांबतात. मृत्यू म्हणजे थंडपणा. अंधार झाला की स्मरण नष्ट होते. अंतकाळी परमेश्वराची आठवण असेल तर मरण सुंदर होते. अन्यथा नुसता चिखल होतो. नामस्मरणाने आतला अग्नी सतत तेवत राहतो.

दीपपूजा हा देवपूजेतला महत्त्वाचा उपचार आहे. शुद्ध तुपाची वात लावून निरंजन ओवाळणे आणि आरती करणे या उपचाराने देवपूजेची समाप्ती होते. मंगलप्रसंगी घरात पूजेसाठी यजमान बसलेले असतात. तेव्हा त्यांच्या सभोवती जास्त माणसे नसतात. मात्र आरतीमध्ये अवघे घर झांज, टाळ यासह उपस्थित राहते. आरती का करायची? दत्तावतारी संत पू. नानामहाराज तराणेकर म्हणतात, ‘आर्ती म्हणजे पीडा. आर्त म्हणजे पीडेने ग्रासलेला. पीडा घालवून टाकण्यास देवाची, संतांची आरती करायची.’ देवस्थानांमध्ये पहाटे काकडआरती, माध्यान्ह आरती, सायंआरती, शेजारती करतात. आरतीचे मर्म मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्राr किंजवडेकर यांनी उलगडून दाखविले आहे.

‘आरती म्हणजे महानिरंजनदीप देवाला दाखवणे. त्यातून रती म्हणजे प्रेम वाढते.’ आरती घेणे ही प्रथा आपल्या यज्ञसंस्थेतून आली आहे. जिथून तेज निर्माण होते तिथेच ते परत ठेवणे असा त्याचा अर्थ आहे. अवघे जीवन, अवघे श्वास ज्योतिर्मय होण्यासाठी पंचज्योतीने परमात्म्याला ओवाळायचे. शास्त्रशुद्ध प्रथा म्हणजे आरती देवाच्या मस्तकावरून न नेता दोन्ही बाजूंनी समांतर अशीच ओवाळावी. आरती सुरू असताना घंटानाद करतात. वाद्यांचा नाद करतात. कारण परमात्म्याची परंज्योती आणि माणसाच्या शरीरातील प्राणज्योती या दोन तेजांच्या अपूर्व मीलनासाठी हा प्रकाशाचा सेतू असतो. हा मंगल सोहळा साजरा होत असताना आनंद व्यक्त व्हावा म्हणून वाद्य गजर करतात.

संत नामदेवमहाराजांनी पांडुरंगाची शेजारती रचली आहे. त्यात ते म्हणतात,  ‘पहुडा पहुडा जी कान्हा कमळलोचना तुम्ही श्रमलात’...  ब्रह्मादिक सनकादिक उभे आहेत. त्यांना जायला आज्ञा द्या, असे या आरती पुढे म्हटले आहे.

‘घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे ।

प्रेमे आलिंगीन अनंत पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा?’ ही देखील शेजारतीच आहे.

प्रत्येक मंगलप्रसंगी तसेच महत्त्वाच्या कामासाठी जाताना औक्षण करतात. जणू तेजाचे प्रक्षेपण. आयुष्यवर्धन म्हणून जिवलगांना तसेच गोठ्यातल्या धनसंपदेलाही औक्षण करतात. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री दत्तप्रभूंना प्रार्थना करतात- ‘वातरहित स्थळी जसे दीप तसे माझे मन होवो.’ मन स्थिर करणारा दीप मनामनात उजळो ही शुभकामना.

- स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article