भातकांडे इंग्लीश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
गजाननराव भातकांडे इंग्लीश मीडियम हायस्कूलचे स्नेहसंमेलन शगुन गार्डन येथे उत्साहात पार पडले. यावेळी अभिनेत्री व पार्श्वगायिका केतकी माटेगावकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका प्रेमलता पाटील व विद्यार्थ्यांनी दीपप्रज्वलन पेले.
यानंतर केजी ते दहावीपर्यंतच्या हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी संमेलनात भाग घेऊन उत्कृष्टरीत्या नृत्य, गीत, गायन तसेच रामायण, महाभारत, कांतारा, तानाजी, छत्रपती शिवाजी महाराज, लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण केले. इस्रोप्रती कृतज्ञता म्हणून नृत्य करण्यात आले. केतकी माटेगावकर यांच्या हस्ते 2023-24 चा आदर्श विद्यार्थी वीरेश दुग्गाणी व आदर्श विद्यार्थिनी नक्षत्रा कुंडेकर यांना तसेच शैक्षणिक क्षेत्रात व खेळामध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
केतकी माटेगावकर यांनी ‘मला वेड लागले प्रेमाचे’ यासह मराठी व संस्कृत गाणी सादर करून वाहवा मिळविली. मिलिंद भातकांडे यांनी 2024-25 मध्ये शंभर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याची घोषणा केली. सूत्रसंचालन विजयालक्ष्मी लोहार, अश्विनी रायबागी, विनायक बांदेकर व विद्यार्थ्यांनी केले. दीक्षा राऊळ यांनी आभार मानले. संमेलनासाठी नृत्यशिक्षक किरण कांबळे, दिनेश, आकाश, संकेत, स्वप्नील वाके यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी विद्यार्थी, पालक व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.