भारती एअरटेलचा नफा 168 टक्क्यांनी वाढला
चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीमधील स्थिती
नवी दिल्ली :
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारती एअरटेलचा निव्वळ नफा 3,593 कोटी रुपये होता, जो गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 1,340 कोटी रुपयांच्या तुलनेत 168 टक्क्यांनी अधिक राहिला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला फी वाढल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. तथापि, आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत 4,159 कोटी रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत नफा 13.6 टक्क्यांनी कमी झाला.
उत्पन्न 41 हजार कोटी पार
एअरटेलचे आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत उत्पन्न 41,473 कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 37,043 कोटी रुपये होते. इतर उत्पन्न 254 कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा प्रति ग्राहक सरासरी महसूल 14.7 टक्क्यांनी वाढून 233 रुपये झाला आहे जो आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत 203 रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्रति ग्राहक सरासरी उत्पन्न 211 रुपये होते.
ग्राहकसंख्या घटली
एअरटेलचा सरासरी प्रति ग्राहक महसूल उद्योगात सर्वाधिक आहे. जिओच्या बाबतीत तो 191.5 रुपये आहे आणि व्होडाफोन आयडियासाठी तो 146 रुपये प्रति वापरकर्ता आहे. एअरटेलने जुलैमध्ये टॅरिफ वाढवले होते, ज्यामुळे त्याचा नफा तर वाढलाच पण ग्राहकांना महागात पडला. एअरटेलच्या ग्राहकांची संख्या जुलै-सप्टेंबर या आर्थिक वर्ष 2025 च्या तिमाहीत 20 लाखांनी घसरून सप्टेंबरच्या अखेरीस 20.7 कोटी झाली. या कालावधीत जिओने 1.09 कोटी ग्राहक गमावले आहेत.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत, एअरटेलचे भारतीय कामकाजातील उत्पन्न मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत 16.9 टक्क्यांनी वाढून 31,561 कोटी रुपये झाले आहे. मोबाईल सेवेतून कंपनीचे उत्पन्न 18.5 टक्क्यांनी वाढून 24,837 कोटी रुपये झाले आहे.
काय म्हणाले एमडी
एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक गोपाल विठ्ठल म्हणाले, ‘आम्ही दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे आणि आमचे उत्पन्न मागील तिमाहीच्या तुलनेत 8.7 टक्क्यांनी वाढले आहे. दरवाढीमुळे प्रति ग्राहक सरासरी उत्पन्नही अपेक्षेनुसार वाढले आहे.’