21 ऑगस्टच्या भारत बंद मध्ये भारतीय बौद्ध महासभा व समता दैनिक दल सहभागी होणार
मालवण वार्ताहर -
सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या मूळ संकल्पनेचा विचार न करता अनुसूचित जाती -जमातींमधील एकता तोडून या प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा आणि क्रिमिलियर लावण्याचा 1/8/2024 रोजी अन्यायकारक असा संविधान विरोधी निर्णय दिला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती जमातींचे अंतर्गत जातींचे गट निर्माण होऊन बिंदू नामावली रोस्टरनुसार त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही. पर्यायाने आरक्षण संपुष्टात येणार आहे. या निर्णयाच्या विरोधात अनुसूचित जाती जमातींमधील सर्व समाजाच्यावतीने 21 ऑगस्ट 2024 रोजी 10:30 वाजता सामूहिक भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल सहभागी होणार आहेत. या बंदमध्ये देशभरातील सर्व शाखा पदाधिकारी कार्यकर्ते व सैनिक एस.सी, एस.टी समाज व त्यांच्या संघटना, संस्था, मंडळी इत्यादी सर्वांनी पूर्ण ताकतीनिशी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय ट्रस्टी/ कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांनी केले आहे.