कोंड्येतर्फे सौंदळ येथे विहिरीत पडून गव्याचा मृत्यू
राजापूर :
तालुक्यातील कोंड्येतर्फे सौंदळ येथील खालचीवाडी येथे एका बागेतील विहिरीत गवा पडून मृत झाल्याची घटना घडली. या मृत गव्याला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने विहिरीबाहेर काढून त्याची विल्हेवाट लावल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
कोंड्येतर्फे सौंदळपैकी खालचीवाडी येथील माधव हर्डीकर यांच्या बागेत असलेल्या विहिरीत गवा पडून मृत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानतंर त्यांनी या बाबत राजापूर वनपाल यांना माहिती दिली. त्यानंतर वनपाल यांनी ही घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना कळवून वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता माधव हर्डीकर यांच्या बागेतील विहिरीत गवा पडून मृतावस्थेत असल्याचे दिसले. या गव्याला विहिरीत रस्सी टाकून जेसीबीच्या सहाय्याने विहिरीबाहेर काढून या गव्याची शिकार किंवा विषबाधा झाली आहे, काय याची खात्री पशुवैद्यकीय अधिकारी व वनाधिकारी यांनी केली. हा गवा नर जातीचा असून त्याचे वय दीड वर्ष असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी प्रभास किनरे यांच्यामार्फत शवविच्छेदन केले असता हा गवा विहिरीतील पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे पशुधन विकास अधिकारी राजापूर यांनी सांगितले. त्यानंतर विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण प्रियांका लगड, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली गव्याला लाकडाची चिता रचून त्याला जाळून नष्ट करण्यात आले. या कामगिरीसाठी सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, राजापूर वनपाल जयराम बावदाणे, वनरक्षक विक्रम कुंभार व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, नितेश गुरव, संतोष चव्हाण, नीलेश म्हादये उपस्थित होते.