‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो’ फेब्रुवारीच्या प्रारंभी
1 ते 3 फेब्रुवारी होणार कार्यक्रम : ऑटोमोबाईल क्षेत्रातील संशोधन, संकल्पनांसह उत्पादनांचे प्रदर्शन
नवी दिल्ली :
दिल्ली येथे येत्या 1 ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ‘इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024’ चे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम भारत मंडपम येथे होणार आहे. हा देशातील पहिला मेगा मोबिलिटी शो राहणार आहे. यामध्ये वाहन क्षेत्रातील संशोधन, संकल्पना आणि उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात जवळपास 50 हून अधिक देशांमधील 600 पेक्षा अधिकचे प्रदर्शक सहभागी होणार आहेत. जगभरातील नामवंत टेक आणि वाहन कंपन्यांचा यामध्ये सहभाग राहणार आहे. मोबिलिटी एक्स्पोमध्ये बीएमडब्लू, फोर्स, होंडा कार्स, ह्युदांई, सुझुकी, महिंद्रा, मर्सिडीज बेंझ, एमजी, स्कोडा, टाटा मोर्ट्स, टोयोटा यासारख्या कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
एक्स्पोमध्ये हरित वाहन तंत्रज्ञानाचे प्रदर्शन
याशिवाय, या एक्स्पोमध्ये ईव्ही, हायब्रीड, हायड्रोजन, सीएनजी/एलएनजी इथेनॉल/बायोफ्युएल यासह मोबिलिटी क्षेत्राशी संबंधित संशोधन आणि तंत्रज्ञान उपक्रम प्रदर्शित केले जातील आणि ग्रीन व्हेइकल टेक्नॉलॉजी, इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट सिस्टीम आणि ड्रोन, बॅटरी आणि चार्जिंग स्टेशन यांसारख्या शहरी मोबिलिटी सोल्यूशन्सचे प्रदर्शन केले जाईल.
उत्पादन प्रदर्शनाव्यतिरिक्त, ज्ञान सत्र आणि कार्यशाळा, कॉन्फरन्स, कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज बैठक, व्यवसाय ते व्यवसाय (बी टू बी), सरकार ते सरकार (जी टू जी) आणि व्यवसाय ते ग्राहक (बी टू सी) संवाद सत्रे देखील असतील. लष्करासाठी आपत्कालीन प्रतिसाद वाहने देखील कार्यक्रमात प्रदर्शित केली जाऊ शकतात.