भरत लाटकर यांचे जीवन साने गुरूजींच्या विचारांना समर्पित; ‘वंचित’चे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे गौरवोद्गार
मुंबईतील संविधान सभेत राष्ट्रसेवा दलाच्या साथीचा सन्मान
कोल्हापूर प्रतिनिधी
राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून साने गुरूजींचा विचार जपत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यासाठी भरत लाटकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. त्यांच्यासारख्या सच्चा समाजवादी साथीचा सत्कार हा साने गुरूजींच्या विचाराचा गौरव आहे, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भावना मांडल्या.
साने गुरुजींच्या जयंती निमित्त रविवारी (24 डिसेंबर) मुंबईत संविधान सभा झाली. या सभेच्या आयोजनाही भरत लाटकर यांचा महत्वपूर्ण सहभाग होता. आयुष्यभर राष्ट्र सेवा दलाच्या विचाराने वाटचाल करत सर्व सामान्यांच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न पाहत कार्य करणारे कोल्हापूरचे राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ नेते, समाजवादी विचाराचे पुरस्कर्ते भरत लाटकर यांचा संविधान सभेत वंचितचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांच्या हस्ते विशेष सत्कार आला.
अॅड. आंबेडकर म्हणाले, साने गुरुजींच्या विचाराने व राष्ट्रसेवा दलाच्या समाजवादी विचाराने ज्यांनी आपले जीवन एक निष्ठेने, ध्येयाने व्यतीत केले. समाजाच्या सर्वांगिण विकासाचे स्वप्न पाहत योगदान दिले. अशा व्यक्तीमत्वामध्ये भरत लाटकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. आजच्या काळात विचाराची जपवणूक करणारी व्यक्तीमत्वे सापडणे दुर्मीळ झाले आहे. त्यामुळे लाटकर यांच्यासारख्यांचा सन्मान हा सानेगुरूजींच्या विचारांचा गौरव आहे. यावेळी डॉ. बाबा आढाव, पन्नालाल सुराणा, राष्ट्र सेवा दल राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, ज्येष्ठ गांधीवादी सेवा दल सैनिक दत्ता गांधी, कपिल पाटील, अंजली आंबेडकर, भरत लाटकर (सर), जी. जी. पारीख, हुसेन दलवाई, अब्दुलकादर मुकादम, सुरेखा दळवी या व इतर ज्येष्ठांचा विशेष सन्मान ज्येष्ठ शरद पवार व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते व बाबा आढाव व डॉ. गणेश जेधे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सन्मान करण्यात आला.