डिजीटल युगातही रात्रीस खेळ चाले...? कोगे परिसरात पोर्णिमा-अमावस्येला स्मशानभूमीवर मुलींच्या फोटोसोबत भानामती
हळदी-कुंकूने माखलेले साहित्य पाहून ग्रामस्थांमध्ये घबराट; गावाबाहेरील व्यक्तींचे कृत्य असल्याचा अंदाज
विश्वनाथ मोरे कसबा बीड
करवीर तालुक्यातील कोगे येथे गेल्या काही दिवसांपासून स्मशानभूमीत आणि नदीकिनारी पौर्णिमा, अमावस्येला व इतर काही ठराविक दिवशी उतारे टाकले जात आहेत. यामध्ये लिंबू व त्यावर मुलीची नावे, नारळ, कापूर, अगरबत्ती आदी साहित्य मांडलेले दिसून येत आहे. चिट्ठ्यांवर नावे लिहून स्मशानभूमीवरील खांबावर लटकवलेली दिसल्याने भीतीचे वातावरण आहे.
कोगे परिसरात काही विघ्नसंतोषी प्रवृत्तींमुळे बाहेरून येऊन अघोरी कृत्य करण्याचे प्रकार घडत आहेत. यासाठी ते रात्रीच्या वेळी असे कार्य करतात. त्यामुळे लहान मुले, युवक, युवतींमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याचा धोका वाढला आहे.
यापुर्वी असे प्रकार करवीर तालुक्यातील काही गावांत घडल्याची चर्चा आहे. स्थानिक पातळीवर कठोर निर्णय घेतल्यामुळे या विघ्नसंतोषी प्रवृत्तींनी कोगे येथे अंधश्रद्धा पसरवण्यास सुरुवात केली आहे. करवीर पश्चिम भागातील सर्व नागरिक व ग्रामपंचायतींनी मिळून पाळत ठेवून असे प्रकार करणाऱ्या काहींना पकडण्याची गरज आहे. त्याद्वारे अंधश्रध्देला खतपाणी घालणारे प्रकार थांबतील. त्यासाठी अशांवर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे.
पन्हाळा तालुक्यातही हाच प्रकार
पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली आणि मोरेवाडी माळासाठी एकच स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीमध्ये तरूण मुलींचे फोटो, लिंबू, हळद कुंकू, टाचणी अशा अनेक वस्तू एकत्रित ठेवल्याचे प्रकार अनेकदा दिसून आले आहेत. या वस्तू नेमक्या कोणी ठेवल्य? याबाबत ग्रामस्थांकडून शोध घेतला जात आहे.
काही चुकीच्या लोकांमुळे गाव बदनाम होत आहे. अंधश्रद्धा पसरवणारे लोक बाहेर गावातील आहेत. गेल्या 61 वर्षांत अशी घटना कधीच घडली नाही. अशा अंधश्रध्दांवर लक्ष ठेवून राहणार आहे. गावात कोणी नको ती अंधश्रध्दा पसरवत असेल तर असे कृत्य करणाऱ्यांची गय होणार नाही. यावर ग्रामपंचायतीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
राजाराम मांगोरे, ग्रामस्थ कोगे
कोगे ग्रामपंचायतीच्या वतीने अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहोत. अशा घटना करताना कोणी दिसल्यास नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा. स्मशानभूमी येथे लाईटची सोय केली आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा मानस आहे. अमावस्या पौर्णिमेला खास गावातील तरूणांची टीम तयार करून या ठिकाणी खडा पहारा देण्यात येणार आहे. संशयित सापडल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करून पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
बनाबाई यादव, सरपंच कोगे