महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भक्तीसारामृत

06:19 AM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

नाथमहाराज आपल्यापुढे देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाचे उदाहरण ठेवतात. ते म्हणतात, देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून अनेक रत्ने, अमृत आणि हलाहल नावाचे अत्यंत जहाल विष हाताला लागले होते. पुढं नाथमहाराज म्हणतात, भगवद्भक्तीची तुलना महासागराबरोबर करता येईल. त्या महासागराचे मंथन केल्यावर काय काय घडू शकते त्याचे अत्यंत बहारदार वर्णन ते करतात. ते म्हणतात, भगवद्भक्तीच्या महासागराचे मंथन करण्यासाठी धैर्याची रविच हवी. गुरु आणि शिष्य, देव आणि दानवांच्याप्रमाणे त्या भक्तीरूपी महासागराचे मंथन करत असतात. त्या मंथनासाठी बोधाचा दोर वापरला जातो भाव आणि विश्वास ही त्या दोराची दोन टोके होत. अशी तयारी करून गुरुशिष्यांचे भगवद्भक्तीच्या महासागराचे मंथन मोठ्या निश्चयाने सुरु होते. सायीच्या दह्याचे विरजण घुसळून लोणी मिळवतात त्याप्रमाणे गुरुशीष्यांनी केलेल्या केलेल्या महासागराच्या मंथनातूनही अनेक आश्चर्यजनक गोष्टी मिळतात. सर्वप्रथम मी ज्ञाता आहे ह्या भावनेचे हलाहल बाहेर पडते. त्या विषाचे जहालत्व जाणून चांगलं काय, वाईट काय हे जाणणारा विवेकरुपी शिव ते गळ्यात धरून ठेवतो. त्यामुळे त्यातला अहंकार नष्ट होतो. मंथन करणाऱ्यांचा अहंकार नष्ट झाल्यावर निराभिमानी गुरुशिष्य भक्तीरूपी महासागर आणखीन घुसळून काढतात. त्यातून भक्तीसारामृत निघते. अशाप्रकारचे भक्तीसारामृत उद्धवाला श्रीकृष्णनाथाने पाजले असे म्हंटले तरी चालेल. धर्म, अर्थ, काम, मुक्ती हे चार पुरुषार्थ आहेत आणि ते मिळवण्यात जीवनाचे सार्थक आहे. ह्यांना पुरुषार्थ असं म्हणतात कारण ते प्राप्त करताना धैर्याची अत्यंत गरज असते. ह्या चार पुरुषार्थाहून सरस असलेले भक्तीचे सार श्रीकृष्णांनी उद्धवाच्या हाती सोपवले. तेसुद्धा कसे तर निजबोधाचे जे पात्र त्यांच्याकडे होते ते अगदी भरभरून उद्धवाला प्यायला दिले. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने अशी उद्धवाची अवस्था झाली. भगवंतांनी निजबोधाचे भरभरून पाजलेले भक्तीचे सार पिऊन उद्धव अगदी तृप्त झाला. त्याला संपूर्ण मन:शांती मिळाली. त्याला परमसुखाची प्राप्ती झाली. त्यामुळे तो कायमचा परब्रह्म भावाला चिकटला. कृपाळू श्रीकृष्ण त्यांच्या भक्तावर सदैव अशीच कृपा करत असतात. भगवंतांनी उद्धवाला दिलेल्या भक्तीसारामृतामुळे भगवंत आणि उद्धवाचा संवाद भक्तीसाराचे  गुह्यज्ञान वर्णन करणारा झाला. ह्याचे श्रवण, मनन आणि निदिध्यास करून जो सेवन करेल त्याला भवबंधनाची भीती म्हणून राहणार नाही. जन्ममरण हे त्याच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही. अर्थात ह्यात नवल असं काहीच नाही. ह्या श्रीकृष्ण उद्धवाच्या संवादाची जे नेहमी संगत करतील आणि ह्या कथेची जे भक्ती करतील त्यांना  भवभयाची प्राप्ती कल्पांतीही होणार नाही. जो ह्या कथेवर पूर्ण श्रद्धा ठेऊन ह्या कथेचे अनुसंधान ठेवेल तो जगाचा उद्धार करेल. सूर्यास रात्र माहित नसते. त्यामुळे जो सूर्याच्याच घरी राह्यला आहे त्याला रात्र काय माहित असणार? त्याप्रमाणे जो स्वरूपाच्या ठिकाणी वसलेला आहे तो सदैव मुक्त असल्याने त्याला बंधमोक्ष माहित नसतो. ज्याला ह्या कथेच्या श्रावणाची गोडी लागून तो सतत ही कथा कुठे ऐकायला मिळेल ह्या अनुसंधानात असतो आणि जमेल तितके तिचे श्रवण करतो त्यालाही भवबंधन लागू होत नाही. ज्याला काही कारणाने कथेचे श्रवण करणे शक्य होणार नाही त्याने नुसते ह्या ग्रंथाचे वाचन केले तरी त्याच्या प्रत्येक श्लोकाच्या वाचनाने त्याच्या दु:खाचे आणि दोषाचे दहन होत असते. ज्याला श्रवण किंवा पठणही जमणारे नसेल त्याने ह्या कथेच्या निरुपणाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी तो ह्या सृष्टीतील देव आणि माणसांना वंद्य होईल.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article