For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भागवतांची नाराजी, जरांगेंचा राग आणि तोंडावर विधानसभा!

06:15 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
भागवतांची नाराजी  जरांगेंचा राग आणि तोंडावर विधानसभा
Advertisement

एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलेली नाराजी, हे राजकारण म्हणजे हिंदुत्व नव्हे अशी उघड टीका, संघाच्या मुखपत्रातून करण्यात आलेले घाव, दुसरीकडे मराठा आरक्षण प्रश्नावर राग व्यक्त करणारे मनोज जरांगे पाटील अशा कात्रीत भाजप सापडला आहे. त्यांना नेमके करायचे काय? शिंदे आणि पवारांची साथ सोडावी तर नसती डोकेदुखी, मराठ्यांसाठी ओबीसींची मनधरणी करावी तर रोष ओढवून घ्यावा लागणार आणि गप्प बसावे तर सगळ्याच बाजूने नुकसान. भाजपसमोर असे धर्मसंकट उभे ठाकले आहे.

Advertisement

हिंदुत्व कोणाचे सुटले?

एरवी भाजपच्या फोडाफोडीच्या धोरणावर टीका खपली नसती. सत्तेच्या शिखरावर पोहोचल्याने तर अशक्यच. पण सरसंघचालकांनी ती केल्याने सर्वांनी ती स्वीकारली. हे हिंदुत्व नव्हे. हिंदुत्व आणि नम्रता या विषयावर बोलताना सेवक नम्र असला पाहिजे अशी भावना भागवत यांनी व्यक्त केली. राज्यात आतापर्यंत ठाकरेंवर ‘हिंदुत्व सोडले’ अशी टीका भाजप नेते करायचे. आता भागवत यांच्या व्याख्येनुसार हिंदुत्व कोण सोडले? हा प्रश्न आता विचारला जाईल. जो राज्यात भाजपसाठी डोकेदुखीचा असेल. लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर असे राजकारण जनतेला पटत नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपचा पारंपरिक मतदार आणि त्या पक्षाच्या यशासाठी झटणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक या निवडणुकीत उदासीन दिसून आला. परिणामी आपले खरे बळ ज्या घटकाच्या जीवावर अवलंबून आहे त्याची जाणीव भाजप पक्षातील पदाधिकाऱ्यांना झाली असावी. बहुदा तरीही त्यातून ते माघारी फिरणार नाहीत म्हणूनच संघाकडून टोकाची टीका झाली असावी असे म्हणण्यास वाव आहे.

Advertisement

संघाचा हा मुद्दा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसला तरीसुद्धा त्याची मुळे महाराष्ट्रात रुजलेली असल्याने इथल्या घडामोडींवर त्यांचे भाषण हे खूपच महत्त्वाचे ठरते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतीत महाराष्ट्रातील संघाच्या मंडळींच्या असलेल्या भावना तीव्रच आहेत. ज्या पवारांच्या विरोधात वर्षानुवर्षे मोहीम चालवली गेली, त्यांना पराभूत केल्याशिवाय महाराष्ट्राची सत्ता खऱ्या अर्थाने आपल्या पद्धतीने चालणार नाही याची जाणीव असलेल्या संघाने नेहमीच एक वेगळ्या राजकारण आणि समाजकारणाचा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण सहकार जर काँग्रेस आणि पवारांच्या कलाने जातोय तर त्याला पर्यायी व्यवस्था उभी करून आपला विचार जपण्याचा आणि तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र कधी नव्हे इतका या प्रयत्नांना जोराचा हादरा बसण्यास 2014 नंतर प्रारंभ झाला.

वास्तविक, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीला खणून काढून आपली कार्यपद्धती रुजवण्याचा संघाचा प्रयत्न होता. प्रत्यक्षात राजकारण आणि सहकारात सत्ता आणि पैशांचा खेळ करणाऱ्या मंडळींना पायघड्या घालून भाजपमध्ये आणण्यास सुरुवात झाली आणि 2024 उजाडेपर्यंत भाजपचा पुरता काँग्रेस, राष्ट्रवादी होतोय की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. शिवसेनेसारखा पंचवीस वर्षाचा जुना आणि एकनिष्ठ मित्र राज्यातील सत्ता खेळासाठी तोडला गेला. तो ज्यांच्या मदतीच्या भरवशावर तोडला त्या पवारांच्या राजकारणाला आपण बळी पडलोय हे मान्य करणेही भाजपच्या नेतृत्वाला आतापर्यंत जमलेले नाही आणि आता त्या चक्रव्यूहात फसत जात जात आपण परतीचे दोर कापून टाकले की काय? याचा थांगपत्ताही नेतृत्वाला लागेनासा झालेला दिसतोय. त्यामुळेच या मार्गावर लाल दिवा लावण्याचे काम संघाने केले आहे. पण, आता चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका असताना भाजपला कितपत माघारी जाता येईल? हा प्रश्नच आहे. तरीही संघाचा दबाव हा मोठा आहे. त्यामुळे सावरण्यासाठी काही अचंबित करणारे निर्णय होतात की ही परिस्थिती सुधारण्यासाठी कालावधी दिला/मागितला जातो किंवा अगदीच हे म्हणणे धुडकावून पुढची वाटचाल सुरू राहते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीत 41 वरून 17 वर पोहोचू असे भाजपच्या नेतृत्वाने स्वप्नातही मान्य केले नसते. अजूनही मतांची संख्या फक्त दोन लाखांनीच कमी आहे, असे समर्थन सुरू आहे. पण या दोन लाखात 45 ऐवजी फक्त 17 खासदार लाभले आहेत हे अर्थमॅटिक वास्तवदर्शी आहे. ते मान्य करायचे किंवा नाही हा झाला नेतृत्वाचा प्रश्न. पण, आपल्या विचारधारेला सोडून इतरांचा मोह धरला की काय फटका बसतो? याचे हे उत्तम उदाहरण ठरावे. राज्याच्या राजकारणात संघाने आपला स्वत:चा एक जातीय फॉर्म्युला बनवला होता. त्यालाही जबर धक्का बसला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी छोट्या मोठ्या शक्ती एकत्र बांधून भाजपच्या मतात चांगली वाढ केली होती. त्याचे परिणाम 2014 च्या निवडणुकीत दिसले होते. मात्र त्यानंतर भाजपने आपला रोख बदलला, दहा वर्षानंतर आता पुन्हा मागे फिरायचे की असेच रेटत पुढे जायचे याचा त्यांना निर्णय घ्यायचा आहे. याच काळात मराठा आंदोलनाने पेट घेतला आणि आता मराठवाड्यातील मराठ्यांना आपण कुणबी असल्याचे दस्तऐवज मिळाले आहेत. त्यांनी केलेल्या मागणीचा परिणाम केवळ मराठवाड्यापुरता न राहता पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा या निवडणुकीत प्रभाव दाखवून गेला आहे.

भाजपच्या मित्र पक्षांना आणि काठावरच्या आमदारांना, अपक्ष पाठीराखे यांना अस्तित्व टिकवायचे आहे. आता जरांगे यांचे ऐका असा दबाव त्यांनी वाढवला आहे. सरकार आपल्या मागण्या अर्धवट सोडून मराठा आरक्षण देऊ केले, असे सांगत आहे. त्या आरक्षणाला विधानसभा निवडणुकीनंतर कोणीतरी आव्हान देणार हे जाणून जरांगे आत्ताच राग व्यक्त करु लागले आहेत. त्यांचा इशारा पोकळ नाही हे मतदानाने दाखवले आहे. खुद्द फडणवीस यांनी त्यामुळे ज्यांना असे दाखले मिळाले त्यांना ओबीसीचा लाभ द्यावा लागेल यासाठी आपण भुजबळांची मनधरणी करू असे सांगावे लागले आहे.

राजकीय आकडेमोड आणि कोणी किती जागा लढवायच्या, कोणाला किती लढू द्यायच्या हे सगळे मुद्दे अशावेळी खूप दूर राहतात. आधी या संकटातून बाहेर कसे पडायचे याचा सरकारला विचार करावा लागणार आहे. वेळ खूप कमी राहिला आहे आणि संकटे वाट पाहत उभी आहेत.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.