महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भगवंत आणि उद्धव, दोघेही एकमेकात विरघळून गेले

06:21 AM Nov 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

भक्त आणि अभक्त यांच्यातील फरक स्पष्ट करताना भगवंत म्हणाले, उद्धवा, अभक्तांचा पुण्यसाठा संपला की, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. माझ्या भक्तांसाठी मात्र हा नियम लागू नाही कारण ते माझी भक्ती कोणत्याही अपेक्षेशिवाय करत असल्याने त्यांच्या खात्यात नव्याने पाप अथवा पुण्य जमा होत नाही. त्यामुळे पूर्वीच्या पाप पुण्य संचयानुसार त्यांच्या वाट्याला जे भोग आलेले असतात ते भोगले की, त्यांना कायमची मुक्ती मिळते. देवांनी सांगितलेले भक्तीचे अद्भुत महात्म्य ऐकून उद्धवाला देवांच्या प्रेमाचे भरते आले. ते पाहून भगवंतांचे हृदय भरून आले आणि ते अत्यानंदाने उद्धवाला म्हणाले, उद्धवा तुझे चारही पुरुषार्थ आता सिद्ध झाले आहेत. असे म्हणून हृदयाच्या गाभाऱ्यातून त्यांनी उद्धवाला आलिंगन दिले. उद्धवाला अत्यंत प्रेमाने आलिंगन दिल्यामुळे भगवंत आपण कृष्ण आहोत हे विसरले. उद्धवही स्वानंदात निमग्न झाल्याने स्वत:चे अस्तित्व विसरला. त्याला आपण उद्धव आहोत ह्याचा विसर पडला. दोघेही एकमेकात विरघळून गेल्यामुळे, दोघांचेही मी पण संपुष्टात आले. भगवंत परिपूर्ण होतेच. उद्धवही आता त्यांच्या रांकेत जाऊन बसला. दोघांच्याही मनातला हेतू विरून गेला. अर्थात हा सगळा प्रश्नोत्तरांचा खटाटोप सामान्य भक्तांना ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावे ह्यासाठी चालला होता. अन्यथा उद्धव सज्ञान असल्याने त्याला फारसा उपदेश करण्याची मुळातच गरज नव्हती. उद्धव आणि भगवंत असे एकरूप झाल्याने, धर्माधर्म मावळून गेले. क्रिया आणि कर्म दोन्हीही संपुष्टात आले. भ्रम आणि निर्भ्रम असा कोणताही फरक राहिला नाही. उद्धवाच्या मनातले सगळे भेद मिटून गेले. तो भगवंतांच्या सांगण्यातला बोध ग्रहण करून आत्मस्वरुपाला मिळता झाला. अशा पद्धतीने त्याला निजपद प्राप्त झाले. अर्थातच मी परब्रह्म झालो असा समज होणे हाही एक भ्रमच आहे कारण ह्यात मी आणि परब्रह्म वेगळे आहेत असा भाव राहतो परंतु उद्धवाला भगवंतांनी मिठीत घेतल्याने त्याच्यातील मी पणा भगवंतांच्या मिठीत विरघळून गेला. त्यामुळे तो निरुपम अशी निजवस्तु झाला. हे पाहून भगवंतांच्या लक्षात आले की, उद्धव जर अशा पद्धतीने त्यांच्यात मिसळून गेला तर उद्धवाकडून पुढे जे कार्य करून घ्यायचे आहे ते कोण करणार? उद्धवा एव्हढा सक्षम ज्ञानी भक्त त्यावेळी त्यांच्या डोळ्यापुढे कुणीच नव्हता. त्यामुळे सर्वज्ञ असलेल्या श्रीकृष्णाने उद्धवाला घातलेली मिठी सैल केली आणि उद्धवाला त्याचे उद्धवपण पुन्हा बहाल केले. उद्धव भानावर आला आणि आपण ब्रह्मस्वरूप झालो होतो हा मोठाच चमत्कार झाल्याचे त्याच्या लक्षात आले. तो आश्चर्यचकित झाला, विस्मयाने स्तंभित झाला. त्याला बसलेला धक्यातून सावरल्यावर उद्धवाने भगवंतांना विचारले, देवा, ही आत्मवस्तू अशी स्वत:जवळ असताना, ती आपल्या जवळच आहे हे लोकांच्या अजिबातच लक्षात का येत नाही? तसेच हे लक्षात येत नसल्याने आत्मवस्तू त्यांच्या हाताला लागायची गोष्ट तर दूरच राहिली. म्हणून ती त्यांच्या हाती कशी लागेल ह्याबद्दल कृपया काही सांगा. उद्धवाच्या मनातली गोष्ट अशी ओठावर आल्याचे पाहून भगवंतांना फार आनंद झाला आणि निजात्मता भक्तांच्या हाती कशी लागेल ह्याबद्दलचा निश्चित असा उपाय श्रीकृष्णनाथ सांगू लागले. ते म्हणाले, जी मंडळी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्तीसाठी, त्यांना कुणीकुणी कायकाय उपाय सांगितले असतील ते सर्व सोडून, माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेऊन अनन्यभावाने मला शरण येतील त्यांना, तुला प्राप्त झालेली ही आत्मस्वरूपस्थिती किंवा निजात्मवस्तू तत्काळ प्राप्त होईल. ह्याबद्दल निश्चिंत रहा. त्यातही माझ्या भजनाला लागल्यावरही धर्म, अर्थ, काम ह्यापैकी कशाची काही वासना शिल्लक राहिली असेल तर तीही पुरवून त्यांना मी माझ्या सदनी माझ्याबरोबर राहण्यासाठी घेऊन येतो.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article