महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भगवद्भक्ती ही महासागरासारखी आहे

06:32 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

नाथमहाराज पुढे सांगू लागले. ते म्हणाले, मी म्हणजे हा देह, ही सर्वसामान्य लोकांना असणारी देहभावना भगवंतांनी उपदेश करण्यापूर्वी उद्धवामध्येही होती परंतु भगवंतांनी त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून त्याची देहभावना समूळ निर्दाळून टाकली आणि त्याचा ब्रह्मानुभाव दृढ केला. त्यामुळे उद्धवाच्या देहाला जरी जन्ममरण लागू असले तरी उद्धवाचा त्या देहाशी काहीच संबंध उरला नव्हता. सर्वपरिपूर्ण परब्रह्म असल्याने तो जरी देहाच्या हालचाली करत असला तरी तो नित्यमुक्त विदेही होता. त्यामुळे त्याला विदेहकैवल्यता मृत्यूपूर्वीच प्राप्त झाली होती असे म्हणणे उचित ठरेल.

Advertisement

अर्थात आत्मज्ञानी योग्याला देहाची फिकीर असतीच कुठं? देह राहिला काय आणि गेला काय त्याला दोन्ही सारखंच असतं कारण त्याला देहबुद्धीच नसते. त्याला तो आत्मस्वरूप आहे, ह्याबद्दल बिलकुल संदेह नसल्याने त्याला ब्रह्मभाव महत्त्वाचा वाटतो आणि तो तसाच अखंड राहावा अशी त्याची इच्छा असते. देह हा दैवयोगाने लाभलेला असतो आणि त्या देहाला जन्ममरण लागू असते. ज्ञाता मात्र पूर्णब्रह्म असल्याने त्याचे जन्ममरणाचे भयच संपलेले असते. तो म्हणतो देह असला काय आणि नसला काय मी तर ब्रह्मस्वरूप आहे. दोरीत सापाचा भास झाला म्हणून काय झालं, दोरीचे दोरपण त्यामुळे थोडेच नष्ट होते. त्याप्रमाणे माझा जन्म झाला किंवा मला मृत्यू आला तरी माझे ब्रह्मस्वरूप नष्ट होत नाही.

जेव्हा मृगजळ दिसत नाही तेव्हा आपण म्हणतो की, ते आता आटले पण जेव्हा ते दिसत होते तेव्हा त्यात कुठे ओलावा होता. म्हणजेच तेथे पाण्याचा अंश नसतानाही पाणी आहे असे आपले उगीचच वाटत होते. त्याप्रमाणे देह जरी समोर वावरताना दिसत असला तरी तो नश्वर असल्याने मिथ्याच म्हणायचा. तेव्हा असा देह नष्ट झाल्यावर विदेहकैवल्यप्राप्ती घडेल असे म्हणण्यात काही अर्थ नाही. ती साधकाला त्याच्या साधनेमुळे तो देहात असतानाच प्राप्त झालेली असते. अशी विदेहकैवल्यप्राप्ती जिवंतपणीच प्राप्त झालेला उद्धव बद्रीकाश्रमात खूप काळ राहिला. त्याचे आयुष्य संपल्यावर त्याला भगवद्गती मिळाली. आता ती मिळाली हे आपलं म्हणायचं कारण तो आदिअंती परब्रह्मच होता त्यामुळे त्यात नव्याने भगवतगती मिळण्यासारखे काहीच नव्हतं.

श्रीकृष्णमूर्ती एव्हढी पूज्य आहे की, ज्यांना योगेश्वराप्रमाणे योगस्थिती प्राप्त झालेली आहे, ज्यांना जीवन्मुक्ती मिळालेली आहे तेही कृष्णचरणाची सेवा करायला धडपडत असतात. श्रीकृष्णचरणाचे श्रेष्ठत्व असे की त्यांच्यापुढे सनकादिक, तसेच अनेक संत सज्जन, ब्रह्मादिक रंक ठरले. अशा स्वानंदस्थितीत असलेल्या श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवावर अतीव कृपा करून स्वत: त्यांची भक्ती कशी करावी हे वर्णन करून सांगितले. ह्यावरून उद्धव किती महान असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. विषय समजावून देण्याची हातोटी नाथमहाराजांना अतिशय उत्तम साधलेली असल्याने मूळ मुद्दा समजावून देण्यासाठी ते एकाहून एक बहारदर उदाहरणे आपल्याला देत असतात. आता नाथमहाराज आपल्यापुढे देव आणि दानवांनी केलेल्या समुद्रमंथनाचे उदाहरण ठेवतात.

ते म्हणतात, भगवद्भक्ती ही महासागरासारखी आहे. त्याचे मंथन करण्यासाठी धैर्याची रवीच हवी. गुरु आणि शिष्य देव आणि दानवांच्याप्रमाणे त्या भक्तीरूपी महासागराचे मंथन करत असतात. त्या मंथनासाठी बोधाचा दोर वापरला जातो. भाव आणि विश्वास ही त्या दोराची दोन टोके होत. अशी तयारी करून गुरुशिष्यांचे भगवद्भक्तीच्या महासागराचे मंथन मोठ्या निश्चयाने सुरु होते. सायीच्या दह्याचे विरजण घुसळून लोणी मिळवतात. त्याप्रमाणे गुरुशीष्यांनी केलेल्या महासागरातूनही अनेक आश्चर्यजनक गोष्टी मिळू लागल्या.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article