सणासुदीत ‘फेक मेसेज’पासून सावधान!
संदेशांपासून सतर्क राहण्याचे आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरात डिजिटल अरेस्टची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. लोकांना खोट्या प्रकरणात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळणारी टोळी सध्या चांगलीच सक्रिय आहे. या पार्श्वभूमीवर ऐन सणासुदीत लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने अलर्ट जारी केला आहे. या अलर्टमध्ये गृह मंत्रालयाने आपल्याला प्राप्त होणारे मेल आणि अन्य संदेशांबाबत दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद वाटणाऱ्या मेल, लिंक किंवा एसएमएसना रिप्लाय न देण्याची सूचनाही देशवासियांना करण्यात आली आहे.
डिजिटल अरेस्ट किंवा ऑनलाईन घोटाळ्यांपासून सर्वसामान्य लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आता पोलीस प्रशासनही लोकांमध्ये जनजागृती करत आहे. दिवाळीसारख्या सणासुदीचा हंगाम सुरू असताना लोकांना आकर्षक ऑफर आणि योजना असलेले मेल आणि मेसेज येत आहेत. त्यामुळेच सोमवारी गृह मंत्रालयाच्या ‘आय4सी’ या सायबर शाखेद्वारे एक अलर्ट जारी केला असून त्यामध्ये लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सोशल मीडियावरून ऑफर्स
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना सुरू असलेल्या डील किंवा डिस्काउंटची माहिती दिली जाते. आमिषाला बळी पडून लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. सणासुदीच्या काळात, लोक बरेचदा ऑनलाईन खरेदी करणे योग्य मानतात ज्यावर त्यांना मोठ्या प्रमाणात सूट मिळते. हे मेल्स किंवा मेसेज अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स साईट्सच्या नावावरही येतात. अशा मेसेजमधून खरेदीवर भरघोस सूट आणि पॅशबॅकसारख्या आकर्षक ऑफर्स देऊन लोकांना फसवतात. तसेच काही संदेशांमध्ये फ्री रिचार्जसारखे आमिषही दाखवले जाते. अशा परिस्थितीत, गृह मंत्रालयाने एक अलर्ट जारी करत लोकांना अशा घोटाळ्यांपासून सावध राहण्यास सांगितले आहे.
डील किंवा डिस्काउंटशी संबंधित सोशल मीडियावर येणाऱ्या मेल्स आणि मेसेजेसपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर विभागाने सर्वसामान्यांना केले आहे. काही काळापासून सोशल मीडियावर मोफत भेटवस्तू आणि भरघोस सवलतीच्या अनेक जाहिराती दिसत आहेत. त्याच अनुषंगाने गृह मंत्रालयाने लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
‘मन की बात’मध्येही पंतप्रधानांकडून उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारीच आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात डिजिटल अरेस्टबाबत सर्वसामान्यांना सतर्क केले होते. या कार्यक्रमात त्यांनी लोकांना या घोटाळ्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांनी लोकांना कोणताही कॉल घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करून कारवाई करण्यास सांगितले होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गृह मंत्रालयानेही आपल्या सायबर शाखेद्वारे हा अलर्ट जारी केला आहे.