भातकापणीवेळी मधमाशांपासून सावध राहण्याचा इशारा
बेळगाव : परतीचा पाऊस थांबल्याने भातकापणीचा हंगाम जोरात सुरू आहे. शेतकरी महिलांसह मोठ्या प्रमाणात भातकापणीत व्यस्त आहेत. पण भातपिकात किंवा बांधावरील वेलात मधमाशांची पोळी असतात, ती दिसत नाहीत. भातकापणी करताना मधमाशांच्या पोळ्याला चुकून धक्का लागला तर त्या हल्ला करतात. त्यांचा चावा थोपवणे कठीण असते. चावताना विषारी काटा सोडल्यामुळे वेदना होऊन सूज येते. जास्त चावल्यास वेदना असह्य होऊन दवाखान्यात दाखल करावे लागते.
बुधवारी शहापूर शिवारात भातकापणीसाठी रयत गल्लीतील महिला गेल्या असता चार महिलांवर दुपारी मधमाशांनी हल्ला केल्याने एक महिला गंभीर तर तीन महिला किरकोळ जखमी झाल्या. गंभीर जखमी महिला दवाखान्यात उपचार घेत आहे. गेल्यावर्षीही अशा बऱ्याच घटना घडल्या होत्या.त्यासाठी शेतकऱ्यांनी सोबत काडिपेटी न्यावी व मधमाशांचा हल्ला झाल्यास वाळलेले गवत, रान असेल तर पेटवून धूर करावा. त्यासाठी शेतकरी व महिलांनी, भातकापणीवेळी मधमाशांपासून सावध रहावे, असे आवाहन शेतकरी राजू मरवे यांनी केले आहे.