For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावधान...! सुरू होतोय परतीचा पाऊस

06:54 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
सावधान     सुरू होतोय परतीचा पाऊस
Advertisement

विजांच्या कडकडाटासह पुढील काही दिवस मुसळधार पावसाचे

Advertisement

विशेष प्रतिनिधी/ पणजी

आता लवकरच परतीच्या पावसाला गोव्यात प्रारंभ होणार आहे. त्यावेळी सर्वांनी सावध राहणे आवश्यक आहे, कारण ऐन पावसाळ्यात जेवढा त्रास झालेला नव्हती त्यापेक्षा जास्त त्रास या परतीच्या पावसाने होऊ शकतो. आज रविवारी सायंकाळी परतीच्या पावसाला गोव्यात प्रारंभ होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने सोमवार आणि मंगळवारसाठी यलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Advertisement

हवामान खात्याच्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये सोमवारपासून परतीचा पाऊस सुरू होईल. सध्या राजस्थानमध्ये परतीच्या पावसाला प्रेरक आणि पूरक असे वातावरण निर्माण झालेले आहे. गोव्यात शनिवारी सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. सांखळी, वाळपई व सत्तरीच्या काही भागात सायंकाळच्या दरम्यान जोरदार तथा मध्यम स्वरूपात पाऊस पडला. आजपासून दुपारच्या नंतरच जोरदार पावसाला प्रारंभ होईल. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस हे परतीच्या पावसाचे वैशिष्ट्या असते. काही वेळा परतीचा पाऊस एवढा धुमाकूळ घालतो की त्यामुळे पूर येण्याची शक्यता असते.

परतीचा पाऊस हा प्रामुख्याने गोव्याच्या पूर्वोत्तर भागाला झोडपून काढत असतो. कारण तो दुपारी साधारणत: दीड ते दोनच्या दरम्यान सुरू होतो आणि मुसळधारपणे कोसळत राहतो. पणजीमध्ये फार क्वचितच परतीचा पाऊस पडतो. परंतु, गोव्याच्या सीमा भागात बेळगाव जिह्यातील खानापूरपासून गोव्याच्या सीमेवर म्हणजे केरी तसेच खालच्या भागात कारवारपर्यंत सुपा, हल्याळ वगैरे भागात मुसळधार पाऊस पडत असतो. परतीचा पाऊस हा जोरदार विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पडतो. कित्येकवेळा विजाही कोसळून पडतात. काहीवेळा तो रात्रभर पडत राहतो. त्याचबरोबर महाराष्ट्रात दोडामार्ग सावंतवाडीपासून तिलारी घाटापर्यंत दुपारी दोन वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडतो आणि सकाळच्यावेळी स्वच्छ सूर्यकिरण असते आणि अचानक दुपारी विजांचा कडकडाट सुरू होतो आणि काळेकुट्ट ढग मुसळधार पावसाला घेऊन येतात.

आतापर्यंत 164 इंच पावसाची विक्रमी नोंद

शनिवारी सांखळी व सत्तरी भागात सर्वत्र पाऊस झाला तसेच आज व उद्या दुपारनंतर पावसाची शक्यता आहे यंदाचा अधिकृतरित्या पावसाळी मौसम संपण्यास आता केवळ नऊ दिवस शिल्लक  आहेत. प्रत्यक्षात पावसाळा संपण्यास आणखी तीन आठवड्यांची शक्यता आहे. मात्र एक ऑक्टोबरनंतर पडलेला पाऊस हा मान्सूनोत्तर पाऊस असे संबोधले जाते. यंदाच्या मौसमात आतापर्यंत 164 इंच पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे. गेल्या पन्नास वर्षांत एवढा विक्रमी पाऊस झालेला नव्हता पावसाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

Advertisement
Tags :

.