पंतप्रधान मोदींकडून भारतीयांचा विश्वासघात
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आरोप : चिक्कबळ्ळापूर काँग्रेस उमेदवार रक्षा रामय्यांना विजयी करण्याचे आवाहन
बेंगळूर : पंतप्रधान मोदींनी दहा वर्षांत दिलेले एकही आश्वासन पूर्ण न करता भारतीयांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. चिक्कबळ्ळापूर लोकसभा मतदारसंघातील बागेपल्ली येथे आयोजित प्रजाध्वनी यात्रा-2 कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार रक्षा रामय्या यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या पुढे म्हणाले, आपले आश्वासन पूर्ण न करणाऱ्या भाजप आणि त्यांच्याशी युती केलेल्या निजदकडे मते मागण्याची नैतिकता नाही. मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडून जाईन, असे सांगणाऱ्या देवेगौडा यांनी आता त्याच मोदींना मिठी मारली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील काँग्रेसचे सरकार कोसळेल, हा देवेगौडा यांचा भ्रम आहे. आमचे सरकार पाच वर्षे सुरक्षित असून आम्ही पुन्हा जिंकू, असेही ते म्हणाले.
भ्रष्टाचाऱ्यांसाठी मोदी मते मागतात
कोविडदरम्यान मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारामुळे पराभूत झालेल्या सुधाकर यांच्यातर्फे मते मागण्यासाठी पंतप्रधान मोदी चिक्कबळ्ळापूर येथे येत आहेत. विधानसभा निवडणुकीत मोदींनी ज्या मतदारसंघात प्रचार केला त्या सर्व मतदारसंघात भाजपचा दाऊण पराभव झाला आहे. हाच वेग लोकसभा निवडणुकीतही राबविला जाईल. यावेळी भारतीयांना फसवणाऱ्या मोदींना देश नाकारेल. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी केंद्रात सत्तेवर येईल. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तात्काळ नव्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जाईल, असे सिद्धरामय्या म्हणाले.
पुढील कालावधीतही गॅरंटी योजना कायम राहतील!
काँग्रेस पक्ष सध्याच्या कालावधीसाठी नव्हे तर पुढील कालावधीसाठीही सत्तेवर येणार आहे. गॅरंटी योजना अनिश्चित काळासाठी सुरू ठेवल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गॅरंटी योजना कोणत्याही कारणास्तव थांबणार नाहीत. काँग्रेसच्या पंचखात्री योजना तात्पुरत्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ते थांबतील या भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या टीकेला सिद्धरामय्यांनी प्रत्युत्तर दिले.