बेरेटेनी, सित्सिपस, डिमीट्रोव्ह विजयी
व्हेरेव्ह, थॉमसन, जेरी, गिरॉन यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था / मोनॅको
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मोनॅको मास्टर्स आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इटलीचा बिगर मानांकित मॅटो बेरेटेनी, ग्रिसचा सित्सिपस, बल्गेरीयाचा डिमीट्रोव्ह यांनी एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. मात्र जर्मनीचा टॉपसिडेड व्हेरेव्ह, थॉमसन, निकोलास जेरी आणि गिरॉन यांचे आव्हान संपुष्टात आले.
सर्बियाचा माजी टॉपसिडेड जोकोविचचा पहिल्या फेरीतील सामना टेबीलोशी बुधवारी उशीरा होत आहे. गेल्या वर्षी जोकोविचला इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत हार पत्करावी लागली होती. जोकोविच आता या स्पर्धेत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीतील एकेरीचे 100 वे जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र अलिकडेच झालेल्या मियामी टेनिस स्पर्धेत जोकोविचला अंतिम सामन्यात मेनसिककडून धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
इटलीच्या बेरेटेनीने दुसऱ्या फेरीतील सामन्यात जर्मनीच्या द्वितीय मानांकित व्हेरेव्हचा 2-6, 6-3, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव करत तिसरी फेरी गाठली. 28 वर्षीय बेरेटेनीने 2021 साली विम्बल्डन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. बेरेटेनीचा तिसऱ्या फेरीतील सामना मुसेटी आणि लिहेक यांच्यातील विजयी खेळाडू बरोबर होईल. 2019 साली मोनॅको मास्टर्स स्पर्धा इटलीच्या फॉगनेनीने जिंकली होती.
ग्रिसच्या सित्सिपसने या स्पर्धेतील आपल्या मोहीमेला शानदार प्रारंभ करताना दुसऱ्या फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या थॉमसनचा 4-6, 6-4, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. सित्सिपसने ही स्पर्धा यापूर्वी तीन वेळा जिंकली आहे. अन्य एका सामन्यात जॅक ड्रेपरने गिरॉनचा 6-1, 6-1 असा फडशा पाडत तिसरी फेरी गाठली. डेन्मार्कच्या होल्गेर रुनेने तिसरी फेरी गाठली असून दुसऱ्याफेरीतील लढतीत त्याचा प्रतिस्पर्धी बोर्जेसने प्रकृती नादुरुस्तीमुळे दुसरा सेट्स चालु असताना स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे रुनेने ही लढत 6-2, 3-0 अशी जिंकली. बल्गेरीयाच्या 15 व्या मानांकित डिमीट्रोव्हने निकोलास जेरीचा 6-3, 6-4 असा फडशा पाडत पुढीलफेरीत स्थान मिळविले. पॉपीरिन, अॅग्युट तसेच मॅकहेक यांनी या स्पर्धेत आपले पहिल्या फेरीतील सामने जिंकले आहेत.