कोलकाताविरुद्ध आज बेंगळूरसमोर पुनरागमनाचे खडतर आव्हान
वृत्तसंस्था/ कोलकाता
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला आज रविवारी येथे इंडियन प्रीमियर लीगच्या एका अवघड लढतीत प्रबळ यजमान कोलकाता नाईट रायडर्सचा सामना करावा लागणार आहे. आणखी घसरण परवडणार नाही याची जाणीव ‘आरसीबी’ला असून त्यामुळे त्यांच्यासमोर खडतर आव्हान राहणार आहे. सात सामन्यांमध्ये सहा पराभव स्वीकारावे लागल्यानंतर आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजेतेपद मिळविण्यासाठीच्या मोहिमेत पुन्हा एकदा मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
सलग पाच पराभवांसह तळाशी असलेल्या आरसीबीसमोर आता त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या शक्यता जिवंत ठेवण्यासाठी उर्वरित सातही सामने जिंकण्याचे कठीण काम आहे. या संघाला त्यांच्या गोलंदाजांनी निराश केलेले असून निवडक फलंदाजांच्या पराक्रमावर ते खूप अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी केकेआर हे एक खडतर आव्हान ठरेल. मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादने ‘आरसीबी’विरुद्ध 3 बाद 287 अशी ‘आयपीएल’मधील विक्रमी धावसंख्या नोंदविली होती. ती बाब त्यांच्या गोलंदाजांच्या मनात नि:संशयपणे रेंगाळत राहील.
या हंगामात ऊ. 11.5 कोटी देऊन खरेदी केलेल्या अल्झारी जोसेफला मोहम्मद सिराजच्या सोबत खेळविणे ही वाईट कल्पना ठरणार नाही. सिराजला सनरायझर्सविरुद्धच्या मागील सामन्यात खेळविण्यात आले नव्हते. तर जोसेफने आरसीबीसाठी तीन सामन्यांमध्ये एक बळी मिळवला आहे आणि प्रति षटक 11.89 धावा दिल्या आहेत. ग्लेन मॅक्सवेलची फिरकी हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. परंतु या संघर्ष कराव्या लागलेल्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने मानसिक थकव्याचे कारण देत सनरायझर्सविऊद्धच्या सामन्यातून माघार घेतली. तो हिप स्ट्रेनशी देखील झुंज देत आहे. यामुळे तो आणखी काही काळ बाहेर राहू शकतो. .
‘आरसीबी’ची फलंदाजी विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि दिनेश कार्तिक यांच्यावर अवलंबून असून उर्वरित खेळाडू सपशेल अपयशी ठरले आहेत. सुनील नरेन, मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा यांच्या विरोधात या तिघांना पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. केकेआरलाही मागील सामन्यात शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करावा लागला होता. ‘आरसीबी’पेक्षा एक सामना कमी खेळलेला ‘केकेआर’ देखील विजयाच्या मार्गावर परतण्याकडे लक्ष देईल. कारण स्पर्धा अर्ध्यावर झालेली असताना आपली गुणसंख्या 10 गुणांवर पोहोचविणे त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने संधी वाढवून जाईल. आरसीबीसाठी सर्वांत मोठा धोका हा गोलंदाजीतच नव्हे, तर फलंदाजीतही नरेन असेल. त्याचा सलामीचा भागीदार फिल सॉल्ट यानेही जोरदार फटकेबाजी केली. आहे.
संघ : कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत, रेहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकूल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन साकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन आणि मुजीब उर रेहमान.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग आणि सौरव चौहान.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.