‘तो’ बंगाली कारागिर पोलिसांच्या ताब्यात! ओरिसामधून पकडण्यात यश
20 किलोहून अधिकच्या सोन्याचा गंडा
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी, सांगलीतील सराफांना सोन्याचे दागिने बनवून देणाऱ्या आणि सुमारे 20 किलोहून अधिकचे सोने घेऊन पोबारा केलेल्या मुख्य सूत्रधाराला पकडण्यात पोलिसांना यश आले. जगन्नाथपुरी (ओरिसा) येथुन गौतम दास याला एलसीबीने ताब्यात घेतले असून त्याची प. बंगाल येथे चौकशी सुरू असल्याचे वृत्त आहे.
आटपाडीतील मुख्य सराफपेठेत पंचवीस वर्षापासून गौतम दास हा सोन्याचे दागिने बनविण्याचे काम करत आहे. येथील सराफ व्यवसायिकांचा विश्वास संपादन करत त्याने बस्तान बसविले. चोख सोने सराफांकडून घेवुन त्याचे तो विविध प्रकारच्या मागणीनुसार दागिने बनवून देत होता. त्याने अनेकांकडुन रोख रक्कमाही तो भिशी, व्याजाने घेत होता. तीन आठवड्यापूर्वी त्याने कुटुंब, कामगारांसह आटपाडीतील सराफांचे सुमारे 20 किलोहून अधिकचे सोने घेऊन पोबारा केला.
एलसीबीने प. बंगाल येथुन गौतमच्या दोन भावांना अटक केली. परंतु मुख्य सूत्रधार हाती लागत नव्हता. त्याबाबत अनेक आक्षेपही तपासाबाबत घेण्यात आले. तक्रारीही झाल्या. पोलिसांनी स्वरूप दास आणि विश्वनाथ दास या दोघांना अटक केल्यानंतर विविध पथके मुख्य सुत्रधार गौतम याचा शोध घेत होते. प. बंगालमधील तपासात अनेक अडचणीही पोलिसांना येत होत्या. त्यावर मार्ग काढत गौतम दास याचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले. जगन्नाथपुरी-ओरिसा येथुन गौतम दास याला ताब्यात घेण्यात आले.
एलसीबीचे पथक त्याच्या प. बंगाल येथील ठावठिकाणांसह अन्यत्र शोध घेत आहे. 20 किलोपेक्षा अधिकचे सोने आणि कोट्यावधींची रोकड घेवुन पोबारा केलेल्या गौतमकडून हा मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. आत्ता या मुख्य सूत्रधाराला आटपाडीला आणण्याची प्रतीक्षा फसवणूक झालेल्यांना लागली आहे.
तक्रारींचीही खातरजमा व्हावी
सराफांसह अनेकांना कोट्यावधींचा गंडा घालून पोबारा केलेल्या गौतम दास याच्याविरोधात सर्वांच्या तक्रारींची खातरजमा व्हावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव पाटील यांनी केली आहे. आटपाडीत पुर्वी दाखल झालेला गुन्हा आणि आत्ता दोन दिवसापूर्वी सांगलीत दाखल झालेल्या गुन्हा याबाबत पोलिसांनी चौकशी करावी. फसवणूक झालेल्या सर्वांचा मुद्देमाल मिळवून द्यावा. तसेच ठराविक घटकांसाठी पोलीस काम करतात, असा संदेश या बंगाली कारागिर फसवणुक प्रकरणी जावु नये, अशी मागणीही शिवसेना तालुकाप्रमुख साहेबराव पाटील यांनी केली आहे.