बंगाली कारागिराकडून सराफास सात लाखांचा गंडा
कोल्हापूर :
आझाद गल्ली परिसरातील सराफास बंगाली कारागिराने सात लाखाला गंडा घातला आहे. नेकलेस बनविण्यास दिलेले 87 ग्रॅम वजनाचे सोने घेवून कारागिराने पलायन केले असल्याची फिर्याद कुमार टेकचंद जैन (वय 58, रा. प्लॉट नं. 550, सी वॉर्ड, आझाद गल्ली, कोल्हापुर) यांनी राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चंद्रशेखर सींगा (रा. दुर्गापूर, वेस्ट बंगाल) याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कुमार जैन यांचा सराफ व्यवसाय असुन आझाद गल्ली परिसरात त्यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. यातील संशयित चंद्रशेखर सींगा त्यांच्याकडे कारागीराचे काम करत होता. त्याने यापुर्वी जैन यांनी दिलेल्या ऑर्डरीप्रमाणे त्याने अनेक वेळा प्रामाणिकपणे दागिने तयार करून दिली आहेत. त्यामुळे जैन यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. ऑक्टोबर महिन्यात जैन यांनी कारागीर सीगा याला नेकलेस बनविण्यासाठी 87 ग्रॅम वजनाचे सोने दिले होते.
मात्र, दोन महिन्याचा कालावधी लोटला तरीही संबंधित कारागिराने नेकलेस बनवून दिला नाही. शेवटी नेकलेस बनवून देण्यास दिलेले सोने घेवून त्याने पलायन केले असल्याची फिर्याद सराफ व्यावसायिक जैन यांनी राजवाडा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार चंद्रशेखर सीगा याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास सुरू आहे.