बंगाल महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत
पुणे
येथे सुरू असलेल्या हॉकी इंडियाच्या वरिष्ठांच्या महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेत बंगालने तेलंगणावर 11 गोल नोंदवून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बंगाल संघातील संजना होरोने शानदार हॅटट्रीक नोंदविली. या स्पर्धेत मध्यप्रदेश, झारखंड, महाराष्ट्र यांनी उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे.
या सामन्यात बंगालच्या संजनाने चौथ्या, 20 व्या, 21 व्या, 38 व्या आणि 44 व्या मिनिटाला असे 5 गोल नोंदविले. बंगाल संघातील सुस्मिता पन्नाने 6 व्या, 10 व्या आणि 42 व्या मिनिटाला असे 3 गोल नोंदवून हॅटट्रीक साधली. मोनिका नागने 7 व्या आणि 40 व्या मिनिटाला असे 2 गुण तर कर्णधार अर्जना डुंगडुंगने 1 गोल केला. या स्पर्धेतील यापूर्वीच्या सामन्यात बंगालच्या संजनाने गुजरात विरुद्ध 8 गोल नोंदविले होते. बंगाल संघाने या स्पर्धेत च गटातून आपले सर्व सामने जिंकून 9 गुणासह पहिले स्थान पटकावित उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अन्य एका सामन्यात उत्तरप्रदेशने क गटातील सामन्यात आंध्रप्रदेशवर 11-2 अशा गोल फरकांनी विजय मिळविला. या विजयामुळे उत्तरप्रदेशने क गटातून दुसरे स्थान मिळविले असून या गटात झारखंड पहिल्या स्थानावर आहे. ब गटातील सामन्यात दिल्लीने केरळचा 4-1 असा पराभव केला. अ गटातील सामन्यात छत्तीसगडने बिहारवर 2-0 अशी मात केली. छत्तीसगडचा या स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. मिझोरामने हिमाचल प्रदेशचा 10-0 असा एकतर्फी फडशा पाडला.