बंगाल टायगर्स हॉकी लीगचे विजेते
वृत्तसंस्था/ राऊरकेला
2024-25 च्या पुरुषांच्या हॉकी इंडिया लीग स्पर्धेचे जेतेपद श्राची र्राह बंगाल टायगर्स संघाने पटकाविले. येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर झालेल्या अटितटीच्या अंतिम सामन्यात बंगाल टायगर्सने हैदरबाद तुफान्सचा 4-3 अशा गोलफरकाने पराभव केला.
हा अंतिम सामना पाहण्यासाठी हॉकी शौकिनांनी खूपच गर्दी केली होती. या सामन्यात बंगाल टायगर्स संघातील जुगराज सिंगने शानदार हॅट्ट्रीक साधली. हैदराबाद तुफान्सतर्फे गोंझालो पिलेटने 9 व्या आणि 39 व्या मिनिटाला असे 2 गोल केले. हैदराबाद तुफान्सचा तिसरा गोल अमनदिप लाक्राने 26 व्या मिनिटाला केला. सॅम लेनिने 54 व्या मिनिटाला बंगाल टायगर्सचा चौथा आणि निर्णायक गोल करुन हैदराबाद तुफान्सचे आव्हान संपुष्टात आणले.
बंगाल टायगर्स संघाने या जेतेपदाबरोबरच 3 कोटी रुपयांचे रोख बक्षिस जिंकले. उपविजेत्या हैदराबाद तुफान्स संघाला 2 कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात आले. या अंतिम सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर दोन्ही संघांनी पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत बचावात्मक खेळावर अधिक भर दिला होता. पण 9 व्या मिनिटाला पिलेटने हैदराबाद तुफान्सचे खाते उघडले. 25 व्या मिनिटाला जुगराज सिंगने वैयक्तिक पहिला गोल नोंदवून बंगाल टायगर्सला बरोबरी करुन दिली. पण हैदराबाद तुफान्सने पुन्हा बंगाल टायगर्सला मागे टाकले. अमनदीप लाक्राने 26 व्या मिनिटाला हैदराबादला पुन्हा आघाडीवर नेले. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत हैदराबाद तुफान्सचा संघ बंगाल टायगर्सवर 2-1 असा आघाडीवर होता. 32 व्या मिनिटाला जुगराज सिंगने संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. 35 व्या मिनिटाला जुगराज सिंगने संघाचा तिसरा आणि वैयक्तिक तिसरा गोल नोंदवूण हॅट्ट्रीक साधली. 39 व्या मिनिटाला पिलेटने वैयक्तिक दुसरा तर हैदराबादचा तिसरा गोल नोंदविला. सामन्याच्या 50 व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघ 3-3 असे बरोबरीत होते. ही कोंडी फोडण्यासाठी दोन्ही संघातील आघाडीच्या फळीतील खेळाडुंनी आक्रमक चाली केल्या. पण भक्कम गोलरक्षणामुळे निर्णायक गोल 53 व्या मिनिटापर्यंत होऊ शकला नाही. 54 व्या मिनिटाला सॅम लेनीने बंगाल टायगर्सचा चौथ आणि निर्णायक गोल करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. शेवटच्या 5 मिनिटामध्ये हैदराबाद तुफान्सला 2 पेनल्टी कॉर्नर मिळाले पण त्याचा लाभ त्यांना घेता न आल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.