बंगाल-बडोदा चुरशीची लढत आज
वृत्तसंस्था / बेंगळूर
2024 च्या सय्यद मुस्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी येथे बंगाल आणि बडोदा यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यात मोहम्मद शमीच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहिल.
या स्पर्धेतील झालेल्या चंदीगढ विरुद्धच्या सामन्यात बंगालने 3 धावांनी थरारक विजय मिळविला होता. या सामन्यात बंगाल संघातील मोहम्मद शमीने दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 17 चेंडूत नाबाद 32 धावा झोडपल्याने बंगालला हा सामना जिंकता आला. तसेच त्याने गोलंदाजीत 13 धावांत 1 गडी बाद केला. दुखापतीनंतर मोहम्मद शमीचे क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले असून त्याने आतापर्यंत विविध राष्ट्रीय स्पर्धांमधील 9 सामने खेळताना 16 गडी बाद केले आहेत. या स्पर्धेत मध्यप्रदेश आणि सौराष्ट्र तसेच मुंबई आणि विदर्भ यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचे सामने अलुर येथे बुधवारी खेळविले जातील. तर बेंगळूरमध्य बडोदा आणि बंगाल तसेच दिल्ली आणि उत्तरप्रदेश हे सामने होतील.