‘पिंक ई रिक्षा’ योजनेकडे लाभार्थ्यांची पाठ
कोल्हापूर :
राज्यातील महिला व मुलींना रोजगार, आर्थिक स्वालंबन आणि सशक्तीकरणास चालना देण्यासाठी राज्य शासनाने 6 जुलै 2024 रोजी पिंक ई रिक्षा योजना आणली आहे. पण या योजनेकडे महिला व मुलीनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. या योजनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 600 महिला लाभार्थ्यांचे लक्ष्य दिले होते. पण केवळ 94 अर्ज आले असून त्यातील फक्त 70 अर्ज परिपूर्ण ठरले आहेत. त्यातही अद्याप एकही पिंक ई रिक्षा कोल्हापूर जिल्ह्यात धावत नाही.
राज्य शासनाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात पिंक ई रिक्षा 17 शहरातील 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. महिला व मुलीना रोजगारास चालना देणे, महिलांचे आर्थिक, सामाजिक पुनवर्सन करणे, महिला व मुलीना सुरक्षित प्रवास हा योजनेचा उद्देश आहे. महिला व बालकल्याण विभागातर्फे या योजनेची कार्यवाही करण्यात येत आहे. 17 शहरातील 10 हजार लाभार्थी निश्चित केले होते. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 600 लाभार्थ्यांचे लक्ष्य होते. पण या योजनेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून केवळ 94 अर्ज आले होते. त्यापैकी 70 अर्ज परिपूर्ण आहेत. पण प्रत्यक्षात अद्याप एकही पिंक ई रिक्षा रस्त्यावर धावत नाही. अनेक कारणांनी महिला लाभार्थ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
पिंक ई रिक्षा योजना राज्यातील 17 शहरासाठी
मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी,अमरावती, चिंचवड, पनवेल,छत्रपती संभाजीनगर,डोंबिवली, वसई&-विरार, कोल्हापूर, सोलापूर
एजन्सीकडून लाभार्थी महिलांना मार्गदर्शन
पिंक ई रिक्षा योजनेसाठी शासनाने एजन्सी नेमली आहे. एजन्सीमार्फत लाभार्थी महिलांना व्यवसायासाठी मार्ग ठरवून दिला जाणार आहे. दोन चार्जिंग स्टेशन दिले जाणार आहेत. रिक्षाची पाच वर्षे देखभाल दुरुस्ती एजन्सी करणार आहे. पाच वर्षानंतर रिक्षाची बॅटरीही एजन्सीच बदलून देणार आहे.
लाभार्थ्यांची मानसिकता नसल्यामुळे प्रतिसाद नाही
राज्य शासनाने महिला व मुलीना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना आणली. पण लाभार्थ्यांची या योजनेबाबत मानसिकता नाही. बँकेचे कर्ज फेडण्याबाबत लाभार्थ्यांमध्ये साशंकता आहे. तसेच पुरुष मंडळींकडून प्रोत्साहन नाही. यामुळे जिल्ह्यात योजनेला प्रतिसाद नाही. विद्यार्थी वाहतूक, बचत गटासाठी या योजनेचा लाभ होऊ शकतो.
सुहास वाईंगडे-जिल्हा महिला बालविकास अधिकारी
पिंक ई रिक्षा योजनेसाठी कोल्हापूर जिल्हा लक्ष्य- 600
15 आक्टोबर 2024 अखेर प्राप्त अर्ज - 94
परिपूर्ण अर्ज -70
कागदपत्रे अपूर्ण- 10
वयामुळे नामंजूर अर्ज- 14
राज्य शासन अनुदान -20 टक्के
बँक कर्ज- 70 टक्के
लाभार्थी स्वहिस्सा- 13,500