For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मदतीद्वारे आनंद मिळविण्याची हितकर सेवा

12:53 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
मदतीद्वारे आनंद मिळविण्याची हितकर सेवा
Advertisement

बेळगाव : माणसाला बोलता येते हे त्याला लाभलेले महत्त्वाचे वरदान आहे. त्यामुळेच तो परस्परांशी संवाद साधू शकतो. त्याला सतत काही तरी सांगायचे असते, ते दुसऱ्याने ऐकावे अशीही त्याची अपेक्षा असते. आज संवादाच्या माध्यमांमध्ये कमालीची प्रगती झाले. तंत्रज्ञानाने, मोबाईलने आणि वेब कॅमेऱ्याने जग जवळ आले. परंतु जेव्हा ही साधने नव्हती तेव्हा संपर्क कसा करावा, हा प्रश्न होता. अशा वेळी रेडिओमुळे दूर अंतरावरचे ऐकू येते हे लक्षात आल्याने त्याचाच वापर करून परस्पर संवाद साधण्यास सुरुवात झाली. त्याच वेळी हॅम रेडिओ अस्तित्वात आले.  हॅम रेडिओला हौशी रेडिओसुद्धा म्हटले जाते. नावानुसार हॅम रेडिओवरून संपर्क करणे, संवाद साधणे ही एक हौस आहे किंवा हॅम रेडिओचे सदस्य होणे हा एक छंद आहे. रेडिओ लहरींचा वापर करून परस्परांशी संवाद साधण्याचा सोपा मार्ग आहे. हा छंद जोपासणाऱ्यांना हौशी रेडिओ ऑपरेटर किंवा रेडिओ ऑपरेटर म्हणतात. हौशी रेडिओ सेवा ही आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेने रेडिओ नियमाद्वारे स्थापन केली आहे. केंद्राच्या संवाद मंत्रालयाच्या वायरलेस प्लॅनिंग अॅण्ड को-ऑर्डिनेशन विंगच्या छत्राखाली याचे काम चालते. हॅमचे सदस्य असणाऱ्या सर्वांना हौशी रेडिओ परवाना असणे आवश्यक आहे. त्याच्या नियमांबद्दल माहिती व माफक तांत्रिक रेडिओ ज्ञान असणे आवश्यक आहे. हॅम सदस्य जगभरात संवाद साधू शकतात. यासाठी त्यांची एक चिन्हांची तसेच कोडवर्ल्डची भाषा आहे. हॅम सदस्य होण्यापूर्वी संवाद मंत्रालयातर्फे घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याहून नोंद घेण्याजोगे म्हणजे जर एका ठिकाणी विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छित असतील तर केंद्र सरकारतर्फे नेमलेले अधिकारी येऊन परीक्षा घेऊ शकतात.

Advertisement

हा एक हौसेचा छंद असल्यामुळे संवाद साधताना राजकारण, अंतर्गत सुरक्षितता, व्यवसाय आणि धर्म याबद्दल मत देणे किंवा चर्चा करणे यावर प्रतिबंध आहे. मात्र वैद्यकीय माहिती, संस्कृती, मनोरंजन इथपासून हवामानातपर्यंत कोणत्याही चर्चा करता येतात. हॅम रेडिओ वापरणे हे अत्यंत सुलभ आहे. फक्त त्यासाठी योग्य उपकरण आवश्यक आहे. साध्या रेडिओ रिसीव्हरपासून महागड्या ब्रॉडकास्टिंग स्टेशनपर्यंत निवड करण्यास वाव आहे. हॅम रेडिओ ऑपरेटर कोणीही होऊ शकते, त्यासाठी कोणतेही बंधन नाही. बारा वर्षांवरील कोणालाही परीक्षा देऊन हॅम ऑपरेटर होता येते. हॅम सदस्य एफएम, एसएसबी या प्रणालीद्वारे संपर्क करू शकतात. मोर्सकोर्ड वापरून रेडिओ टेलिग्राफी ही त्यांची भाषा आहे. हे तंत्र समजून घेतल्यास हॅम सदस्य होणे हे अत्यंत आनंददायी आणि हितकारीसुद्धा आहे. रेडिओ ट्रान्समिशनवरून अॅन्टीनाच्या साहाय्याने जगात कोठेही बोलता येते. हॅमचे महत्त्व आणीबाणीच्या व आपत्कालीन परिस्थितीत अधिक लक्षात येते. हॅम रेडिओ ऑपरेटर आपत्कालीन काळात धावून येतात. कोल्हापूरचा पूर किंवा इर्शाळवाडीची घटना घडली तेव्हा 70 हून अधिक हॅम

ऑपरेटर धावून आले. वायरलेस ट्रान्समिशनच्या साहाय्याने त्यांनी परिस्थितीची माहिती देण्याचे महत्कार्य केले. जेव्हा इंटरनेट सेवा बंद झाल्या तेव्हा कारच्या, ट्रकच्या बॅटरीचा आधार घेऊन हॅम ऑपरेटर्सनी स्टेशन सुरू ठेवले. बेळगावमध्येसुद्धा हॅम ऑपरेटर आहेत. त्यांनी परीक्षा देऊन परवाना घेतला आहे. येथील सदस्य ओमप्रकाश खियानी, मंजुनाथ शिंदे, प्रकाश उबराणी, बी. आर. जोशी, जगदीश मलकण्णावर, बी. जी. हेगडे आदी अनेक जण हॅम सदस्य आहेत. कारगिल विजय दिवसावेळी हॅमचे सदस्य प्रत्यक्ष बंकरमध्ये पोहोचले व तेथून त्यांनी संवाद साधला, अशी माहिती ओमप्रकाश यांनी दिली. हॅमसेवा 24 तास कार्यान्वित आहे. हॅम रेडिओमुळे एखाद्या व्यक्तीचा शोध घेणे, अडचणीत किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करून त्यांचा जीव वाचविणे सोपे होते. त्यामुळे ही अतिशय आनंददायी व हितकरी अशीच सेवा आहे. देशभरात 50 हजारांहून अधिक हॅम रेडिओ ऑपरेटर आहेत, असे मंजुनाथ शिंदे यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.