बेन स्टोक्सला दुखापत
वृत्तसंस्था/मँचेस्टर
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला स्नायु दुखापत झाल्याने एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावेळी मैदानातून बाहेर जाण्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागली. इंग्लंड आणि लंका यांच्यात होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेत स्टोक्सच्या सहभागाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात नॉर्दन सुपरचार्जर्स संघाकडून 33 वर्षीय बेन स्टोक्स खेळत होता. त्याच्या संघाला विजयासाठी मँचेस्टर ओरीजनल्स संघाने 153 धावांचे आव्हान दिले होते. एकेरी जलदधाव घेत असताना त्याला स्नायु दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला मैदानातून बाहेर जाण्यासाठी दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागला. गेल्या महिन्यात इंग्लंडने विंडीजचा कसोटी मालिकेत 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता. स्टोक्सकडे या मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व सोपविण्यात आले होते. इंग्लंड आणि लंका यांच्यात पहिली क्रिकेट कसोटी 21 ऑगस्टपासून ओल्ड ट्रॅफोर्ड येथे सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे या मालिकेतील शेवटची कसोटी ओव्हल मैदानावर 6 सप्टेंबरपासून खेळविली जाणार आहे.