बेल्जियम विजेता तर भारत उपविजेता
वृत्तसंस्था / मलेशिया
शेवटच्या क्षणापर्यंत चुरस निर्माण झालेल्या अंतिम सामन्यात बेल्जियमने भारताचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव करत सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. भारतीय हॉकी संघाला या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल 34 व्या मिनिटाला थिबेयु स्टॉपब्रोक्सने नोंदविला. बेल्जियमने पहिल्यांदाच अझलन शहा हॉकी चषकावर आपले नाव कोरले असून त्यांनी या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत दोनवेळा आपला सहभाग दर्शविला आहे. सदर स्पर्धेतील शनिवारी झालेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने कॅनडाचा 14-3 असा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. पण अंतिम सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंना मिळालेल्या तीन पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविता आले नाहीत ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. भारतीय संघातील जुगराज सिंग, अमित रोहीदास आणि कर्णधार संजय हे पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविण्यात तरबेज म्हणून ओळखले जातात. पण बेल्जियमविरुद्धच्या सामन्यात भारतीय आघाडी फळीला बेल्जियमची भक्कम बचावफळी भेदण्यात अपयश आले. या स्पर्धेतील भारतीय हॉकी संघाचा हा दुसरा पराभव आहे. सदर स्पर्धेतील साखळी फेरीतील झालेल्या सामन्यात बेल्जियमने भारतावर 3-2 असा विजय मिळविला होता. बेल्जियमचा हॉकी संघ हा युरोपियन विभागातील एक बलाढ्या म्हणून ओळखला जातो.
या स्पर्धेसाठी भारतीय निवड समितीने अनुभवी मनप्रित सिंग आणि हार्दीक सिंग यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. कारण नवोदित आणि युवा हॉकीपटूंची कामगिरी विविध स्पर्धांमध्ये चांगली होत असल्याचे पाहून या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी त्यांची संघात निवड करण्यात आली होती. अंतिम सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर केवळ 10 मिनिटांच्या कालावधीत बेल्जियमने भारतीय हद्दीतच अधिकवेळ चेंडू राखण्यात यश मिळविले. त्यामुळे भारताची बचावफळी डळमळीत झाली. भारतीय गोलरक्षकाने या कालावधीत बेल्जियमची दोन आक्रमणे थोपविली. बेल्जियमला दोन पेनल्टी कॉर्नर सुरूवातीच्या काही मिनिटांतच मिळाले होते. पण भारतीय गोलरक्षकाने त्यांना खाते उघडण्यापासून रोखले. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. उत्तराधार्थातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर बेल्जियमने आपल्या डावापेचात बदल करुन भारतावर चांगेलच दडपण आणले. दरम्यान सामन्यातील 34 व्या मिनिटाला स्टोकब्रोक्सने भारतीय बचावळफीला हुलकावणी देत तसेच गोलरक्षकाला बगल देवून आपल्या संघाचा एकमेव निर्णायक गोल नोंदविला. या सामन्यातील शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय संघाने अधिक वेगवान खेळ करत बेल्जियमशी बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. पण बेल्जियमच्या खेळाडूंनी भारताचे हे डावपेच शेवटी फोल ठरवत हा अंतिम सामना केवळ एका गोलाच्या फरकाने जिंकल्याने भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.