बेल्जियमची भारतावर मात
वृत्तसंस्था / इपोह (मलेशिया)
येथे सुरू असलेल्या सुलतान अझलन शहा चषक पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत मंगळवारी पावसाचा अडथळ्यात झालेल्या सामन्यात बेल्जियमने भारताचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेत सोमवारी सलामीच्या सामन्यात भारताने बलाढ्या आणि विद्यमान कोरियाचा पराभव केला होता.
मंगळवारच्या सामन्यात भारतातर्फे अभिषेकने 33 व्या मिनिटाला तर शिलानंद लाक्राने 57 व्या मिनिटाला गोल नोंदविले. बेल्जियमतर्फे रोमन ड्युव्हेकॉटने 17 व्या आणि 57 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. तर निकोलास केर्पलने 45 व्या मिनिटाला एक गोल नोंदविला. या स्पर्धेत एकूण सहा संघांचा समावेश आहे.
मंगळवाराच्या सामन्याला प्रारंभ झाल्यानंतर दहाव्या मिनिटालाच बेल्जियमला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यानंतर 12 व्या मिनिटाला त्यांना दुसरा पेनल्टी कॉर्नर लाभला. पण भारतीय गोलरक्षकाने बेल्जियमचे हे हल्ले थोपविले. 17 व्या मिनिटाला रोमन ड्यूव्हेकॉटने मैदानी गोल करुन बेल्जियमचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत बेल्जियमने भारतावर 1-0 अशी आघाडी मिळविली होती.
उत्तराधार्थातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर सामन्यातील 33 व्या मिनिटाला अभिषेकने मैदानी गोल करुन भारताला बरोबरी साधून दिली. 45 व्या मिनिटाला निकोलास केर्पलने बेल्जियमला पुन्हा आघाडीवर नेले. केर्पलने हा गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. 57 व्या मिनिटाला ड्यूव्हेकॉटने बेल्जियमचा तिसरा तर वैयक्तिक दुसरा गोल केला. सामना संपण्यास केवळ 3 मिनिटे बाकी असताना शिलानंद लाक्राने रवीचंद्रन सिंगच्या पासवर भारताचा दुसरा गोल केला. मात्र अखेर बेल्जियमने हा सामना 3-2 अशा फरकाने जिंकून पूर्ण तीन गुण वसुल केले. आता भारताचा या स्पर्धेतील पुढील सामना यजमान मलेशियाबरोबर बुधवारी खेळविला जाणार आहे.