For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पाच्या सेवेत बेल्जी श्वान

02:02 PM Aug 18, 2025 IST | Radhika Patil
सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पाच्या सेवेत बेल्जी श्वान
Advertisement

कराड :

Advertisement

सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पात होणारी अवैध वन्यजीव शिकार, तस्करी, वृक्षतोड याला आळा घालण्यासाठी बेल्जियन शेफर्ड जातीचे श्वानपथक स्वातंत्र्यदिनापासून दाखल झाले आहे. या श्वानासह डॉग हँडलर म्हणून वनरक्षक कु. सारिका जाधव व साहाय्यक वनरक्षक अनिल कुंभार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हरियाणा येथील इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्रात २८ आठवड्यांच्या स्निफर डॉग ट्रेनिंगसाठी सह्याद्री व्याघ्र राखीवमधून कु. सारिका जाधव (वनरक्षक, फिरते पथक) यांना 'मेन डॉग हँडलर आणि अनिल कुंभार (वनरक्षक, पाटण) यांना सहाय्यक डॉग हँडलर म्हणून पाठवण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी ट्राफिक इंडियामार्फत 'बेल्जियन शेफर्ड' जातीचे श्वान उपलब्ध करून देण्यात आले होते. २८ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण घेऊन 'बेल्जियन शेफर्ड' जातीचे श्वान 'बेल्जी' त्यांच्या डॉग हँडलर हे कोल्हापूर वनवृत्तातील प्रादेशिक व वन्यजीव विभाग, कोल्हापूर येथे वन आणि वन्यजीव यांच्या संरक्षणासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेवा बजावण्यास सज्ज झाले आहेत.

Advertisement

ट्रैफिक म्हणजे वनस्पती आणि प्राण्यांचे व्यापार यांच्यावर देखरेख करणारी आघाडीची अशासकीय संस्था आहे. ही एक आघाडीची जागतिक अशासकीय संस्था आहे, जी वन्यप्राणी व वनस्पती व्यापारावर लक्ष केंद्रित करते.

बेल्जियन शेफर्ड जातीचे श्वान हे भारतात वन्यजीव संरक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, शिकारविरोधी प्रयत्नांमध्ये भूमिका बजावण्यासाठी वाढत्या प्रमाणात वापरले जात आहेत. त्यांची बुद्धिमत्ता, चपळता आणि मजबूत कार्यनिती त्यांना ट्रॅकिंग, अवैध वस्तू, शिकारी शोधणे कामांसाठी योग्य बनवते. व्याघ्र प्रकल्पामध्ये शिकार विरोधी कारवाईत मदत हे श्वान करतील. वृक्षतोड आणि संरक्षित प्राण्यांची तरकरी यासारख्या बेकायदेशीर गुन्ह्यांचा शोध घेतील आणि गुन्हेगारीच्या घटनांच्या तपासात मदत करतील. त्यांच्या तीव्र वास घेण्याच्या क्षमतेमुळे त्यांना ड्रग्ज, स्फोटके आणि वन्यजीव प्रतिबंधित वस्तूंसह विविध प्रकारच्या वस्तू शोधता येतात त्यामुळे ते विविध सुरक्षा ऑपरेशन्समध्ये मौल्यवान भूमिका बजावतात.

  • प्रशिक्षणात सारिका जाधव व बेल्जी श्वान प्रथम

राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्र (एनटीसीडी) ही भारतातील एक प्रमुख संस्था आहे, जी सुरक्षा एजन्सींना कुत्रे आणि त्यांच्या हाताळकांना प्रशिक्षण देते. ही संस्था भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडो तिबेटीयन सीमा सुरक्षा दलाचा एक भाग आहे. देशभरातील ८ राज्यांमधून (अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाना, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि महाराष्ट्र) एकूण १४ श्वान या प्रशिक्षणात ट्राफिक इंडियामार्फत दिले होते. प्रशिक्षणादरम्यान घेण्यात आलेल्या श्वान प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेत आठ राज्यांमधून सारिका जाधव व श्वान बेल्जी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

  • आमच्या विभागाची कार्यक्षमता वाढेल

सह्याद्री व्याघ्र राखीवमधून सारिका जाधव यांनी डॉग हँडलर म्हणून राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. बेल्जी जातीच्या श्वानाचे प्रशिक्षण पूर्ण होऊन आता ते कोल्हापूर विभागात कार्यरत झाले आहे. हे प्रशिक्षित श्वान वन व वन्यजीव संरक्षणात, विशेषतः अवैध वन्यजीव व्यापार रोखणे, शिकार प्रकरणांचा तपास व शोधमोहीम अशा कामांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. अशा अत्याधुनिक व प्रशिक्षित साधनसंपत्तीमुळे आमच्या विभागाची कार्यक्षमता आणि गती निश्चितच वाढेल.

                                                                                                     -तुषार चव्हाण, संचालक, सह्याद्री व्याघ्र राखीव

Advertisement
Tags :

.