महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेला बेळगावकरांचा भरघोस प्रतिसाद

10:13 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

200 देशांना सेवा : 2600 हून अधिक पार्सल रवाना : तीन ठिकाणी सेवा उपलब्ध

Advertisement

बेळगाव : खासगी कुरिअर कंपन्यांना टक्कर देत पोस्ट कार्यालयाने आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा सुरू केली. इतर कंपन्यांपेक्षा विश्वासू सेवा दिल्यामुळे अवघ्या दीड वर्षात जगभरात 2600 हून अधिक पार्सल पाठविण्यात आली. बेळगावमधून जगभरातील 200 देशांमध्ये पार्सल सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनाही कमी खर्चामध्ये आपल्या नातेवाईकांना तसेच उद्योजकांना आपले साहित्य परदेशात पाठविणे सोयीस्कर झाले आहे. मनीऑर्डर, टपाल, त्यानंतर बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या पोस्ट विभागाने आता पार्सल क्षेत्रातही आपले पाय रोवले आहेत. सुरुवातीला कॅम्प येथील बेळगावच्या मुख्य पोस्ट कार्यालयात बेळगाव महानगरपालिका मर्यादित क्षेत्रामध्ये पार्सल सेवा सुरू करण्यात आली. खासगी कुरिअर कंपन्यांना टक्कर देत ही सेवा उत्तम पद्धतीने सुरू आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा पोस्ट विभागाने कार्यान्वित केली आहे. दीड वर्षापूर्वी पोस्ट विभागाने कुरिअर सेवेचे निर्यात केंद्र सुरू केले. 2022 मध्ये सुरू झालेल्या या केंद्राला सुरुवातीचे काही दिवस तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु, त्यानंतर मात्र जसजशी नागरिकांना माहिती मिळत गेली, तसतसे पार्सल पाठविणाऱ्यांची संख्या वाढत गेली. आतापर्यंत अमेरिका,

Advertisement

कॅनडा, इंग्लंड, सिंगापूर, मलेशिया, युएई, सौदी अरेबिया, स्वीडन, स्पेन, फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह 219 देशांमध्ये पार्सल पाठविण्यात आली आहेत. आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधे, घरगुती उत्पादने, अन्नधान्य, स्थानिक फराळ, मसाल्याचे पदार्थ अशा विविध वस्तू निर्यात केल्या जात आहेत. इंटरनॅशनल ट्रॅक पॅकेज सर्व्हिस (आयटीपीएस) या प्रणाली अंतर्गत 2 किलो वजनाचा माल निर्यात केला जाऊ शकतो. याद्वारे 38 देशांमध्ये व्यावसायिक वस्तूंची निर्यात होऊ शकते. आंतरराष्ट्रीय हवाई पार्सल प्रणालीअंतर्गत जास्तीत जास्त 20 किलो वजनाचा माल निर्यात करता येतो. या प्रणालीद्वारे 219 देशांमध्ये साहित्य निर्यात करता येते. आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट प्रणालीद्वारे जास्तीत जास्त 35 किलो वजनाचा माल निर्यात केला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय पार्सल असेल तर त्याला विशेष पॅकिंग करावे लागते. या पॅकिंगचीही सोय पोस्ट ऑफिसमध्ये करून देण्यात आली आहे. बेळगाव पोस्ट विभागाने यासाठी स्वतंत्र विभाग तयार केला असून मुख्य पोस्ट कार्यालयाच्या शेजारीच स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

मुख्य पोस्ट कार्यालयातील निर्यात केंद्राला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांसोबत उद्योजकांनाही आपले साहित्य आंतरराष्ट्रीय बाजारात पाठविणे सोयीचे ठरत आहे. कमी दरात सुरक्षित व दर्जेदार सेवा देत असल्यामुळेच नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे.

विजय वडोनी (पोस्ट अधीक्षक)

शहरातील तीन कार्यालयांमध्ये सोय

सुरुवातीला कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयातूनच आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा दिली जात होती. आता नागरिकांच्या मागणीनुसार शिवाजीनगर व टिळकवाडी या दोन्ही पोस्ट कार्यालयांमधून निर्यात विभाग सुरू करण्यात आला आहे. मागील दीड वर्षात 2600 हून अधिक पार्सल पाठविण्यात आली असून यातून पोस्ट कार्यालयाला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article