‘बेलगाम ट्रेक-2024’चा आज समारोप
प्रतिनिधी/ बेळगाव
अखिल भारतीय एनसीसी ट्रेकिंग मोहीम ‘बेलगाम ट्रेक-2024’, एनसीसी संचालनालय कर्नाटक व गोवा यांच्या संयुक्त सहकार्याने 22 डिसेंबरपर्यंत ट्रेकिंग मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. 17 रोजी बेळगुंदीपर्यंतच्या ट्रेकिंगला निशाण दाखवून सुरुवात करण्यात आली. एअर कमोडोर बी. अरुणकुमार, त्यानंतर कर्नाटक, गोवा या राज्यातील अधिकाऱ्यांनी भेट देऊन ट्रेकिंग मोहिमेत भाग घेतलेल्या छात्रांना शुभेच्छा दिल्या.
आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, अंदमान, निकोबार, पाँडिचेरी, केरळ, लक्षद्वीप, गुजरात, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतील पाच एनसीसी संचालनालयातील 510 कॅडेट्स व 15 सहयोगी कॅडेट्सनी तसेच अधिकाऱ्यांनीही ट्रेकिंग मोहिमेमध्ये भाग घेतला आहे.
बसुर्ते, बेळगुंदी, देवरवाडी, हंगरगा व महिपाळगड या ठिकाणी ट्रेकिंग झाले. शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने छात्रांसाठी या उपक्रमाचे आयोजन होते. रविवार दि. 22 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाने ट्रेकिंग शिबिराचा समारोप होणार आहे. राष्ट्रीय एकात्मता, साहस, सहनशक्ती यासारखे गुण छात्रांमध्ये यावेत, हाही या मोहिमेचा उद्देश आहे.