बेळगाव संघ विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी पात्र
मुला-मुलींच्या प्राथमिक व माध्यमिक अशा चारही संघाना विजेतेपद
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शटल बॅडमिंटन स्पर्धेत बेळगाव शहर तालुक्याच्या मुला-मुलींच्या प्राथमिक व माध्यमिक अशा चारही संघानी विजेतेपद पटकाविले. हे संघ शिरसी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. महानगरपालिकेच्या नूतन बॅडमिंटन सभागृहात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शटल बॅडमिंटन स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत प्राथमिक गटात मुलांच्या पहिल्या उपांत्य फेरीत बेळगाव शहर तालुका संघाने व बैलहोंगल संघाचा 2-0 असा. दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सौंदत्ती तालुक्याने बेळगाव ग्रामीणचा 2-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात बेळगाव शहर तालुका संघाने सौंदत्तीचा 2-0 असा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात दुहेरीत विराज जाधव, कौस्तुभ राणेगरकर व अमोग गणाचारी यांनी दुहेरीत 21-10, 21-14 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
मुलींच्या गटात बेळगाव तालुक्याने बैलहोंगल संघाचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. माध्यमिक विभागात मुलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव शहर तालुका संघाने बेळगाव ग्रामीण संघाचा 2-0 तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सौंदत्ती संघाने बैलहोंगल संघाचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत बेळगाव शहर तालुक्याने सौंदत्तीचा 2-0 असा सरळ पराभव केला. एकेरीत बेळगावच्या वेदांतने सर्वेशचा 21-14, 21-17 तर दुहेरीत तेजस बेळगावकर व तनय गिरी या जोडीने सर्वेश व लखन या जोडीचा 21-10, 21-11 अशा सेटमध्ये पराभव करून विजेतेपद पटकाविले. मुलींच्या गटात बेळगाव शहर तालुका संघाने सौंदत्ती संघाचा 2-0 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. सामन्यानंतर संघटनेचे सचिव रमेश सिंगद व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना पदके व प्रमाणपत्रे देण्यात आली. स्पर्धेसाठी पंच म्हणून उमेश मजुकर, मिनाक्षी मन्नोळकर, सिल्विया डिलिमा, लिना डिसोजा यांनी काम पाहिले.