For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-सुळगा-तुरमुरी-बाची रस्ता दुरुस्ती की जनतेची धूळफेक?

11:15 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव सुळगा तुरमुरी बाची रस्ता दुरुस्ती की जनतेची धूळफेक
Advertisement

खड्डे बुजविण्याच्या नावाखाली केवळ खडी पसरण्याचे काम : वाहनधारक-नागरिकांतून तीव्र संताप

Advertisement

वार्ताहर /उचगाव

बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील सुळगा, उचगाव, तुरमुरी, बाची या पट्ट्यामध्ये शनिवारी सार्वजनिक बांधकाम खात्याने खड्डे बुजविण्याच्या नावाखाली सदर खड्ड्यांतून खडी टाकून खड्डे बुजविले. मात्र या खड्ड्यांमध्ये टाकलेली खडी रस्त्यावर विखुरल्याने या खडीमुळे पूर्वी असलेल्या रस्त्यापेक्षा सदर रस्ता अधिक धोकादायक झाला असून पुन्हा अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे रस्ता दुऊस्ती की प्रवासी जनतेची निव्वळ धूळफेक आहे, असा संतप्त सवाल या मार्गावरून ये-जा करणाऱ्या असंख्य प्रवासी आणि नागरिकांतून विचारला जात आहे.

Advertisement

बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील अर्गन तलाव, गांधी चौक ते महाराष्ट्र-कर्नाटक सरहदीवरील बाचीपर्यंतच्या 15 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. रस्त्यावरती दीड बाय चार ते पाच फुटाचे मोठ मोठे खड्डे पडल्याने आणि या रस्त्याची चाळण झाल्याने यासंदर्भात अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांना, सार्वजनिक बांधकाम खात्याला आणि या भागाच्या मंत्री, आमदार, खासदारांना निवेदने, विनंती करूनदेखील याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या संदर्भात संबंधितांकडून पाहणी केली गेली. रस्त्याची दुऊस्ती करण्यात येईल, अशाप्रकारची आश्वासने देण्यात आली. मात्र प्रवाशांची निव्वळ धूळफेक चालली आहे.

खड्ड्यांत खडी टाकून रस्ता दुऊस्ती केल्याचे अवघे नाटकच चालल्याने प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात या भागातील अनेक गावातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून वृक्षारोपण करून शासनाचा निषेधही व्यक्त केला. तातडीने या रस्त्याची दुऊस्ती करण्यात येईल, असे आश्वासनही शासनाने दिले. मात्र शनिवारी या रस्त्यावरील सुळगा, बेळगुंदी फाटा, कल्लेहोळ फाटा, उचगाव फाटा, तुरमुरी, बाची आणि कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीपर्यंतच्या या मार्गावरील असलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांतून खडी टाकण्यात आली.

आमदार, खासदार, मंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा

सदर खडी वाहनांच्या ये-जामुळे, वाहतुकीमुळे रस्त्यावर विखुरल्याने या खडीवरून अनेक लहान, दुचाकी वाहने घसरून मोठे अपघात झाल्याच्या अनेक घटना शनिवारी रात्रीपासून रविवारपर्यंत घडलेल्या आहेत. याच्यामध्ये अनेक जणांना दुखापतीही झाल्या आहेत. याचबरोबर याच मार्गावरील छोटे छोटे खड्डे बुजविण्यात आले. एकेक ठिकाणी 10 ते 12 खड्डे आहेत. याच्यातील दोन किंवा तीन खड्ड्यांतून अवघी खडी टाकण्यात आली. मात्र सात ते आठ मोठमोठे खड्डे तसेच खडी न टाकताच सोडण्यात आले आहेत. हा निव्वळ प्रवासी वर्गाचा खेळखंडोबा शासन करत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून केल्या जात आहेत. यासाठी आता ठोस निर्णय या भागातील प्रवासी वर्गातून घेण्यात येणार आहे. यासाठी रास्ता रोको आणि या भागातील सर्व खासदार, आमदार, मंत्र्यांना घेराव घालून याचा जाब विचारला जाईल, असा इशारा या भागातील तमाम प्रवासी आणि नागरिकांतून देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.