बेळगाव स्पोर्ट्स क्लबची विजयी सलामी
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित पेरेंट्स चषक अंतर अकादमी 14 वर्षाखालील मुलांच्या 50 षटकांच्या एक दिवशीय चौरंगी क्रिकेट स्पर्धेला बुधवारपासून युनियन जिमखाना मैदानावर प्रारंभ झाला. उद्घाटनाच्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने आनंद क्रिकेट अकादमीवर 13 धावांनी विजय मिळविला. कनिष्क वेर्णेकरला ‘सामनावीर’ पुरस्कार देण्यात आला. प्रमुख पाहुणे जिमखाना संचालक संजय मोरे यांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संचालक रोहित पोरवाल, ताहीर सराफ, चंदन कुंदरनाड, फैज धारवाडकर, आनंद करडी, सोमनाथ सोमनाथचे, महांतेश देसाइ, मिलिंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
पहिला सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी बाद 195 धावा केल्या. त्यात दृश रायकरने 2 चौकारासह 41, सचिन तलवारने 5 चौकारासह 40, आयुष आजगावकरने 3 चौकारांसह 31, आऊष कुंदपने 3 चौकारांसह 29 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे अर्णव पाटीलने 2, आऊष मालवणकर, आऊष देसुरकर व सिद्धांत यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमी संघाचा डाव 40.3 षटकात 151 धावात आटोपला. त्यात अंश वेर्णेकर 3 चौकार 1 षटकारासह 30, श्लोक चडीचालने 2 चौकारांसह 18, सिद्धांत व आऊष देसुरकर यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे कनिष्क वेर्णेकरने 22 धावात 4 गडी बाद केले. समर्थ तलवारने 2, सोहम के, आयुष आजगावकर, ईशान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.