For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सहा दशकांपासून बेळगाव-सावंतवाडी रेल्वेमार्गाकडे दुर्लक्ष

10:43 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सहा दशकांपासून बेळगाव सावंतवाडी रेल्वेमार्गाकडे दुर्लक्ष
Advertisement

सर्व्हे अहवाल सकारात्मक : 1800 कोटी खर्च अपेक्षित : आर्थिक तरतुदीच्या प्रतीक्षेत  : बेळगाव-सावंतवाडी 114 कि.मी. : विकासाचे नवे पर्व येईल : नूतन खासदारांकडून पाठपुराव्याची गरज

Advertisement

विजयकुमार दळवी /चंदगड

गेल्या पंचावन्न वर्षांपूर्वी सर्व्हे झालेल्या बेळगाव-सावंतवाडी रेल्वेमार्गाकडे रेल्वे मंत्रालयाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदारांनी या प्रश्नाकडे कधीही पोटतिडकीने पाहिले नाही. चंदगड तालुक्यातील शेवटचे गाव ‘मिरवेल’ ते कोल्हापूर हे अंतर 160 कि.मी. असून जसा चंदगड तालुका जिल्ह्यापासून अंतराने लांब आहे, तसाच तो आजवरच्या खासदारांनी विकासापासूनही तितकाच लांब ठेवला आहे. बेळगाव-सावंतवाडी रेल्वेमार्गाचा 2018 साली पुन्हा सर्व्हे झालेला असून त्याचा अहवाल साऊथ वेस्टर्न रेल्वेचे मुख्य इंजिनिअर राम गोपाल यांनी 21 सप्टेंबर 2018 रोजी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला दिलेला आहे. मात्र, पाठपुराव्यात लोकप्रतिनिधी कमी पडत असल्यामुळे हा प्रकल्प रेंगाळला आहे. चंदगड तालुका कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या त्रिवेणी संगमावर आहे. उत्तर कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा बेळगाव-सावंतवाडी हा लोहमार्ग असून त्यासाठी तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी जून 2020 मध्ये निवेदन देऊन पाठपुरावा करण्यासंबंधी विनंती केली होती. त्यांनीही आपल्याला मिळालेल्या रेल्वे राज्यमंत्रिपदाचा लाभ भागाच्या विकासासाठी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

Advertisement

दुर्दैवाने कोरोनाच्या साथीत सप्टेंबर 2020 मध्ये राज्यमंत्री सुरेश अंगडी कालवश झाले. त्यानंतर या लोहमार्गाकडे पुन्हा दुर्लक्षच झाले आहे. 1970 साली या लोहमार्गाचा पहिला सर्व्हे झाला. बेळगाव, कुद्रेमनी, माडवळे, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, कानूर, आंबोलीमार्गे सावंतवाडी असा हा लोहमार्ग असून 1970 साली रेल्वेने उभा केलेले ‘डिमार्कर’ आजही जागोजागी दिसतात. कुद्रेमनी ते माडवळेदरम्यान तर कुणीही जागा अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केलेली नसतानाही लोकांनीच आगामी रेल्वेमार्गाची जागा सोडली असून त्यावरून सध्या वाहतूकही सुरू आहे. अवजड वाहने जाऊ नयेत म्हणून लोखंडी कमान उभी करण्यात आलेली आहे. बेळगाव-सावंतवाडी मार्गाने दक्षिण रेल्वे आणि कोकण रेल्वे जोडली जाणार आहे. बेळगाव भागातील भाजीपाला कोकण-गोव्यात तर कोकणातील मासे दक्षिण कर्नाटकासह पश्चिम महाराष्ट्रात पोहोचण्यास मदत होणार आहे. दळणवळणाच्या दृष्टीने भारतात सर्वात स्वस्त रेल्वेचा प्रवास असून त्यावर एकदा भांडवली गुंतवणूक केली की त्याच मार्गावर डांबरी रस्त्यासारखा वारंवार खर्च करावा लागत नाही.

रेल्वे मंत्रालय चार ते साडेचार हजार कि.मी. अंतराच्या नवीन लोहमार्गाची देशात बांधणी दरवर्षी करीत असताना बेळगाव-सावंतवाडी या 114.6 कि.मी. अंतराच्या लोहमार्गाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. एकीकडे बेळगाव-कोल्हापूर आणि बेळगाव-धारवाड लोहमार्गाचे अंतर कमी करण्यासाठी थेट रेल्वेलाईनचे प्रकल्प युद्धपातळीवर सुरू झाले आहेत. नेहमी पोटभर जेवणाऱ्यांनाच आग्रहाने अगदी अजीर्ण होईपर्यंत वाढले जात आहे. आणि जिथे पंचावन्न वर्षांपासून भुकेने व्याकुळ आहेत, त्यांच्या ताटात मात्र साधी पेजही वाढली जात नाही, याचे दु:ख वाटते. कोल्हापूरच्या खासदारांचा कोल्हापूर- वैभववाडी लोहमार्गासाठी जसा पाठपुरावा सुरू आहे, तशी बेळगाव-सावंतवाडी लोहमार्गासाठी पोटतिडीक दिसत नाही. म्हणूनच हा प्रकल्प कमालीचा रखडला आहे. बेळगाव-सावंतवाडी या लोहमार्गाच्या 2018 साली झालेल्या दुसऱ्या सर्वेक्षणातून अनेक तांत्रिक बाबी पुढे आलेल्या आहेत. हा मार्ग बेळगाव, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार आहे. बेळगाव-सावंतवाडी या मार्गाचे रस्त्यावरील अंतर 102 कि.मी. असले तरी लोहमार्गाचे अंतर 114.600 कि.मी. होणार आहे. या मार्गातील घाटाचे अंतर 24.30 कि.मी. असून मार्गात एकूण 268 पूल असणार आहेत. त्यामध्ये मोठ्या पुलांची संख्या 39 असणार आहे. हा लोहमार्ग ब्रॉडगेज होणार असून तो इलेक्ट्रिक स्वरुपाचा असणार आहे.

या मार्गात बेळगाव, चंदगड, आंबोलीसह एकूण 9 स्टेशन्स निश्चित केली आहेत. या लोहमार्गाचा अपेक्षित खर्च 1805.09 कोटी ऊपये असून निश्चितच तो भारतीय रेल्वेला परवडणारा आहे. या लोहमार्गामुळे होणारा आणखी एक प्रमुख लाभ म्हणजे जेव्हा कधी कोकण रेल्वेच्या मार्गात दरडी कोसळून मार्ग बंद पडतो, त्यावेळी कोकण रेल्वेची वाहतूक बेळगावमार्गे वळविता येणे शक्य होणार आहे. शिवाय सध्याचे बेळगावहून खानापूर, लोंढा, कॅसलरॉक, मडगाव, करमळी, पेडणेमार्गे सावंतवाडी हे अंतर 279 कि.मी. आहे. बेळगाव-सावंतवाडी लोहमार्ग झाल्यास हे अंतर 114.60 कि.मी. होऊन 165 कि.मी. सध्यापेक्षा रेल्वेमार्गाने बेळगावला सावंतवाडी जवळ होणार आहे, असा सकारात्मक अहवाल बेंगळूरचे मुख्य इंजिनिअर राम गोपाल यांनी रेल्वे मंत्रालयास पाठवला आहे.  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होणाऱ्या खासदाराने बेळगाव आणि सिंधुदुर्गच्या खासदारांच्या मदतीने स्वत: कॅप्टनशीप करून बेळगाव-सावंतवाडी लोहमार्गाचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यामुळे चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील लोक रेल्वेच्या कक्षेत येतील. या भागातील प्रवासी पंढरपूर, मुंबईला रेल्वेने जाऊ शकतील. त्यामुळे या भागाच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल. स्वातंत्र्यानंतरही रेल्वेच्या प्रतीक्षेत दिवस कंठणाऱ्या वंचित भागाच्या विकासाची परिमाणे बदलू शकतील.

सकारात्मक अहवाल पाठवला

साऊथ-वेस्टर्न रेल्वेच्या हुबळी येथील विभागीय कार्यालयाचे इंजिनिअर ईशान श्रीवास्तव यांची बेळगाव- सावंतवाडी लोहमार्गासंबंधी भेट घेतली असता ते म्हणाले, या लोहमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. केंद्र शासनास सकारात्मक अहवाल पाठवला आहे. तथापि, गेल्या चार-पाच वर्षात या मार्गासाठी आर्थिक तरतूद झालेली नाही. लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीने हा मार्ग होऊ शकतो. मात्र, त्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.

ईशान श्रीवास्तव

या लोहमार्गासाठी प्रसंगी आत्मदहन

चंदगड तालुक्यातील शिरोली गावचे ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते बाबासाहेब देसाई-शिरोलीकर यांना आपल्या हयातीत चंदगड तालुक्यातून जाणारी रेल्वे पाहायची आहे. तालुक्यात कुणी मंत्री आले की त्यांना ते या लोहमार्गाचा पाठपुरावा करण्याची विनंती करतात. रेल्वेसाठी उपोषणासारखे हत्यार उपसण्याचीही त्यांची तयारी आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना त्यांनी सविस्तर निवेदन पाठविले होते. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. नुकताच त्यांनी हुबळी येथील साऊथ-वेस्टर्न विभागीय रेल्वे कार्यालयाला भेट देऊन माहिती घेतली. निवडणुकीनंतर नव्या रेल्वेमंत्र्यांना येत्या जून महिन्यात दिल्लीत प्रत्यक्ष भेटण्याचा त्यांचा संकल्प आहे. रेल्वेसाठी प्रसंगी आत्मदहन करीन, असाही त्यांनी इशारा दिलेला आहे.

बाबासाहेब देसाई-शिरोलीकर

Advertisement
Tags :

.