बेळगाव-सांबरा रस्त्याची दुर्दशा,रस्त्याच्या दुतर्फा झाडाझुडपांचा वेढा
दिशादर्शक फलक दिसणे कठीण : देखभालीकडे दुर्लक्ष
वार्ताहर/सांबरा
बेळगाव-सांबरा रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे दिशादर्शक फलक दिसणे कठीण झाले आहेत. या रस्त्याच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. तरी संबंधित खात्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. बेळगाव-सांबरा हा एक महत्त्वाचा रस्ता आहे. येथे विमानतळ असल्याने या रस्त्यावरून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तसेच या रस्त्याला बेळगाव-बागलकोट राज्यमार्ग म्हणूनही ओळखले जाते. त्यामुळे लांबपल्ल्याच्या वाहनांचीही येथून जास्त वर्दळ असते.
मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये रस्ता ठिकठिकाणी पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. वाहनचालकांना येथून जाताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे तर रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे वाढल्याने दिशादर्शक फलक गायब झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या देखभालीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र त्यामानाने रस्त्याचे काम वेळेवर होत नाही. त्यामुळे वाहनचालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी संबंधित खात्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.