बेळगावकरांना आजपासून दंडासह भरावी लागणार घरपट्टी
विनादंड घरपट्टी भरण्याची मुदत संपली
बेळगाव : महानगरपालिकेला घरपट्टी जमा करण्याचे उद्दिष्ट दिले जाते. यावर्षी 73 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत 49 कोटी 59 लाख 21 हजार 702 रुपये जमा झाले आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये विनादंड 2 कोटी 51 लाख 13 हजार 156 रुपये जमा झाले आहेत. मंगळवारपासून दोन टक्के दंडासह घरपट्टी भरावी लागणार आहे. महानगरपालिका महसूल गोळा करण्यासाठी धडपडत असते. राज्य सरकारने मध्यंतरी घरपट्टी भरणाऱ्यांना पंधरा दिवसांची मुभा दिली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कर जमा झाला. त्यानंतर विनादंडासह काही जणांनी रक्कम भरली आहे. मात्र आता ती मुदत संपली असून यापुढे दोन टक्के दंडासह रक्कम भरावी लागणार आहे. महानगरपालिका आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी महसूल विभागाला जास्तीत जास्त कर गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महसूल अधिकाऱ्यांनी कर जमा केला आहे. ऑनलाईन व बेळगाव वनमधूनही मोठ्या प्रमाणात कर जमा होत आहे. काहीजण बँकेत चलन भरून कर भरत आहेत. आता ऑनलाईन, बेळगाव वनमधून व चलन भरून कर भरताना दोन टक्के दंड द्यावा लागणार आहे.