वाहतूक कोंडीने बेळगावकर हैराण
काँग्रेस रोडसह काही ठिकाणच्या रस्त्यांवर बॅरिकेड्स : अन्य मार्गाने वाहतूक वळविल्याने गैरसोय
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील अनेक रस्त्यांवर गुरुवार दि. 26 रोजी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काँग्रेस रोडसह काही ठिकाणच्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून पोलिसांनी पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविल्याने तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडण्याची वेळ बेळगावकरांना आली.
गुरुवारपासून काँग्रेसचे गांधी भारत अधिवेशन बेळगावात सुरू झाल्याने पोलीस खात्याकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. महनीय व्यक्ती येणार असल्याने खबरदारी घेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गावरून वळविण्यात आल्याने याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागला. बहुतांश वाहनचालकांना वाहतूक वळविण्यात आल्याची कल्पना नसल्याने दैनंदिन कामानिमित्त येणाऱ्यांना याचा फटका बसला. वाहतूक नियमन करण्यासह बंदोबस्तासाठी सुमारे 3500 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र पोलीस छावणीचे स्वरूप असून बॅरिकेड्स लावून वाहतूक वळविली जात आहे. परिणामी गुरुवारी सकाळपासून विविध रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याने याचा मन:स्ताप सहन करावा लागला.