For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-पुणे अवघ्या साडेसहा तासात

11:29 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव पुणे अवघ्या साडेसहा तासात
Advertisement

वंदे भारतमुळे बेळगाव-पुण्याच्या प्रवाशांच्या वेळेची बचत

Advertisement

बेळगाव : वंदे भारत एक्स्प्रेस सोमवार दि. 16 पासून हुबळी ते पुणे दरम्यान धावणार आहे. अवघ्या साडेसहा तासात बेळगावहून पुण्याला वेगवान प्रवास करता येणार आहे. यापूर्वी इतर एक्स्प्रेसला बेळगावहून पुण्याला जाण्यासाठी आठ ते साडेआठ तासांचा कालावधी लागत होता. सोमवारी या एक्स्प्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार असून आठवड्यातून तीन दिवस प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला धारवाड, बेळगाव, मिरज, सांगली, सातारा या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. हुबळीहून बुधवार, शुक्रवार व रविवार तर पुण्याहून गुरुवार, शनिवार व सोमवार असे तीन दिवस सेवा दिली जाणार आहे. बेळगाव व कोल्हापूरला एकच वंदे भारत सुरू होणार, अशी चर्चा असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, रेल्वे बोर्डने गुरुवारी रात्री वेळापत्रक जाहीर करून पुणे-कोल्हापूर व पुणे-हुबळी या मार्गावर स्वतंत्र वंदे भारत धावणार असल्याचे स्पष्ट केले.

वंदे भारत वेळापत्रक जाहीर

Advertisement

रेल्वे बोर्डने गुरुवारी रात्री हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक जाहीर केले. पहाटे 5 वाजता हुबळी येथून निघालेली एक्स्प्रेस 5.15 वा. धारवाड, 6.55 वा. बेळगाव, 9.15 वा. मिरज, 9.30 वा. सांगली, 10.35 वा. सातारा तर दुपारी 1.30 वा. पुण्याला पोहोचेल. तर दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी पुणे येथून निघालेली रेल्वे दुपारी 4.08 वा. सातारा, सायंकाळी 6.10 वा. सांगली, 6.45 वा. मिरज, 8.35 वा. बेळगाव, रात्री 10.20 वा. धारवाड तर 10.45 वा. हुबळीला पोहोचेल.

बेळगावमध्ये होणार जोरदार स्वागत

नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सोमवार दि. 16 रोजी रात्री 8 वा. वंदे भारतचे स्वागत केले जाणार आहे. बेळगाव रेल्वेस्थानकात होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, खासदार जगदीश शेट्टर, खासदार प्रियांका जारकीहोळी, खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार राजू सेठ, कर्नाटकचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, हणमंत निराणी, डॉ. साबण्णा तळवार व मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत कार्यक्रम होणार आहे.

Advertisement
Tags :

.