बेळगाव पोलिसांना नव्या कॅपची प्रतीक्षा
आदेशाला महिना उलटूनही अंमलबजावणी नाही : अधिवेशन काळात तरी नवी टोपी मिळणार का?
बेळगाव : कर्नाटक राज्य पोलीस खात्यातील कॉन्स्टेबल आणि हेडकॉन्स्टेबल दर्जाच्या पोलिसांची जुनी कॅप बदलून ‘पी’ कॅप लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांच्या हस्ते 28 ऑक्टोबर रोजी बेंगळुरात नवीन टोपीचे अनावरण करण्यात आले. मात्र, सदर टोपी बेळगाव पोलिसांना अद्याप उपलब्ध झालेली नाही. जुन्या टोपीच्या आधारेच येथील पोलिसांचे कामकाज सुरू आहे. नवीन टोपीचे अनावरण होऊन महिना उलटला असला तरीही टोपी उपलब्ध झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलीस कॉन्स्टेबल व हेडकॉन्स्टेबलना गेल्या अनेक वर्षांपासून एकाच प्रकारची टोपी परिधान करावी लागत होती. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या टोपीप्रमाणे कॉन्स्टेबल व हेडकॉन्स्टेबलनादेखील टोपी उपलब्ध करून देण्याचा विचार गृहखात्याकडून सुरू होता. मात्र सदर टोपी कोणत्या रंगाची व किती वजनाची असावी, याबाबत विचारविनिमय सुरू होता. अखेर निळ्या रंगाची व हलक्या वजनाची टोपी पोलिसांना देण्यात आली आहे.
केवळ बेंगळूर वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये नवीन टोप्या उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे जुन्या टोप्यांवरच पोलिसांचे कामकाज सुरू आहे. बेळगावात सोमवार दि. 8 डिसेंबरपासून कर्नाटक सरकारचे विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. यानिमित्ताने मंत्रिमंडळ व अधिकारी बेळगावात दाखल होणार आहेत. या काळात तरी पोलिसांना नवी टोपी मिळणार की जुन्या टोपीवरच बंदोबस्त करावा लागणार? हे मात्र पहावे लागणार आहे.
बेळगाव पोलिसांनाही कॅपचे लवकरच वितरण
राज्यातील पोलीस खात्यात सेवा बजावणाऱ्या कॉन्स्टेबल आणि हेडकॉन्स्टेबलना पी कॅप देण्यात आली आहे. बेळगाव पोलिसांनाही सदर कॅपचे लवकरच वितरण केले जाणार असून कॅपसाठी ऑर्डर देण्यात आली आहे.
- पोलीस आयुक्त भूषण बोरसे