For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महांतेशनगर चेनस्नॅचिंग प्रकरणी बेळगाव पोलीस महाराष्ट्रात रवाना

06:22 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
महांतेशनगर चेनस्नॅचिंग प्रकरणी बेळगाव पोलीस महाराष्ट्रात रवाना
Advertisement

चोरीनंतर भामट्यांनी कोल्हापूरकडे पलायन केल्याचे उघड : सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील महांतेशनगर व कणबर्गी रोडवर चेनस्नॅचिंग करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी बेळगाव पोलिसांचे पथक महाराष्ट्रात रवाना झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गुन्हेगारांची छबी कैद झाली असून पोलिसांनी या दोघा जणांची छबी जाहीर केली आहे.

Advertisement

श्रावण शुक्रवार वरदमहालक्ष्मी पूजनासाठी शाहूनगरहून महांतेशनगर येथील नातेवाईकांच्या घरी गेलेल्या सुमा मत्तीकल्ली या महिलेच्या गळ्यातील 25 ग्रॅमचे मंगळसूत्र पळविण्यात आले आहे. महांतेशनगर येथील मेडप्लसजवळ ही घटना घडली आहे. तर वरदमहालक्ष्मी पूजेसाठी टिळकवाडीहून माळमारुती परिसरात गेलेल्या कमलदीप शिलवंत या महिलेच्या गळ्यातील 15 ग्रॅमचे मंगळसूत्र कणबर्गी रोडवरील विशाल मार्टजवळ पळविण्यात आले आहे.

एफझेड मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी हे कृत्य केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले आहे. मोटारसायकल चालवणाऱ्या भामट्याने आपल्या अंगावर हिरवे जॅकेट परिधान केले होते, तर पाठीमागे बसलेल्या भामट्याने काळे जॅकेट परिधान केले होते. या दोघांनीही जीन्स पँट घातली होती. मोटारसायकल चालवणाऱ्याने आपल्या पायात बूट घातले होते तर पाठीमागे बसलेल्या भामट्याच्या पायात पांढरे चप्पल होते.

दोन्ही चेनस्नॅचिंगच्या घटनांनंतर आरोपींनी एफझेड मोटारसायकलवरून कोल्हापूरच्या दिशेने पलायन केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बेळगाव पोलिसांच्या एका पथकाने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी गुन्हेगारांसाठी शोध सुरू केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांची छबी जाहीर केली असून या गुन्हेगारांविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 9480804107 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.