महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव आता आंतरराज्य गुन्हेगारांच्या रडारवर

12:01 PM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्थानिक चोरांच्या उच्छादाबरोबर विविध राज्यातील गुन्हेगारांचे आव्हान : अमलीपदार्थ विक्री, घरफोडी तसेच मंदिरेही लक्ष्य

Advertisement

बेळगाव : भर पावसातही बेळगाव शहर व जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रकार सुरू आहेत. स्थानिक गुन्हेगारांबरोबरच आंतरराज्य व आंतरजिल्हा गुन्हेगारांचाही उपद्रव वाढला असून केवळ महिनाभरातील काही घटना लक्षात घेता महाराष्ट्र, आंध्रप्रदेशसह विविध राज्यातून येऊन गुन्हेगारांनी बेळगावात गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. आंतरराज्य गुन्हेगारांनी बेळगाव पोलिसांसमोर तपासाचे आव्हानच उभे केले आहे. गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातील एका अट्टल गुन्हेगाराने बेळगावात धुमाकूळ घातला होता. शहापूर, वडगाव, अनगोळ परिसरात अनेक ठिकाणी घरफोड्या करून त्याने पलायन केले आहे. सहा महिन्यांनंतरही त्या गुन्हेगाराला पकडणे पोलीस यंत्रणेला शक्य झाले नाही. गेल्या सहा महिन्यांच्या काळात आंध्रप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र व शेजारच्या गोव्यातून येऊन बेळगावात गुन्हे केल्याची उदाहरणे आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारांना हळूहळू अटक केली जात आहे. बीट व्यवस्था बळकट असूनही हे गुन्हेगार बंद घरांना लक्ष्य बनवत आहेत. जिल्ह्यातील अथणी, कागवाडसह काही तालुक्यात दरोडेखोरांचा उच्छाद सुरू आहे.

Advertisement

परप्रांतीय गुन्हेगारांना अद्याप अटक नाही

गोकाक पोलिसांनी 1 जुलै रोजी बनावट नोटांप्रकरणी सहा जणांच्या टोळीला अटक केली होती. यापैकी पाच संशयित बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूरचे असल्याचे आढळून आले. 30 जून 2024 रोजी बेळगावहून शिमोग्याकडे जाणाऱ्या कारचा इनोव्हातून पाठलाग करून कित्तूरजवळ कारमधील दोघा जणांना मारहाण करून दहा लाख रुपये पळविण्यात आले आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारही परप्रांतीय असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मात्र, अद्याप कोणाला अटक झाली नाही. 10 जुलै रोजी उद्यमबाग पोलिसांनी ठाणे येथील रफिक शेख याला पोलीस कोठडीत घेऊन त्याच्याजवळून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले. खरेतर त्याला लातूर पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाची परवानगी घेऊन लातूरमधून रफिकला पोलीस कोठडीत घेण्यात आले. शहापूर पोलिसांनीही दोन दिवसांपूर्वी सुदर्शन चंद्रपाटले रा. वडवळ, जि. लातूर याला पुणे येथील येरवडा कारागृहातून पोलीस कोठडीत घेऊन त्याने बेळगाव परिसरात चोरलेले 12 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

मार्केट पोलिसांनी 28 जून रोजी अरगोंड अरविंद ऊर्फ अरुणकुमार मूळचा रा. इंदिरानगर, जि. रंगारेड्डी, सध्या राहणार कोंडकल्ल-शंकरपल्ली, जि. संगारेड्डी याला अटक करून त्याच्याजवळून मोठ्या प्रमाणात लॅपटॉप, मोबाईल व रोकड जप्त केली आहे. नीटच्या परीक्षा देणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना गाठून एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे सांगून त्याने बेळगाव परिसरातील अनेकांना कोट्यावधी रुपयांना ठकविले आहे. कित्तूर पोलिसांनी एका ढाब्यावर काम करणाऱ्या राजस्थानमधील चार तरुणांना अटक करून त्यांच्याजवळून 684 ग्रॅम अफीम जप्त केले आहे. अमलीपदार्थांची विक्री करण्यासाठी परप्रांतीय गुन्हेगार बेळगावात येतात. सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी 25 जुलै रोजी मिरज येथील वासीम शेख या युवकाला अटक करून त्याच्याजवळील 2 किलो गांजा जप्त केला आहे. गांजा, अफीम विक्रीसाठी महाराष्ट्र व राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात विक्रेते बेळगावात येतात.

पन्नीसह इतर अमलीपदार्थ गोवा व मुंबईहून बेळगावात येतात. अमलीपदार्थांची विक्री करण्यासाठी परदेशी गुन्हेगारही बेळगावात येतात. यापूर्वी नेपाळ, सिंगापूर आदी ठिकाणाहून आलेल्या अनेकांना अटकही झाली आहे. कित्तूर पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील चन्नापूर येथील एका हार्डवेअर दुकानात चोरी करताना दुकानावरून पडून फारुख हुईलगोळ रा. हुबळी हा तरुण जखमी झाला. हुबळीहून तिघा जणांची टोळी चोरीसाठी कित्तूरला आली होती. वरील काही घटना लक्षात घेता केवळ चोरी, घरफोड्यांसाठीच नव्हे तर अमलीपदार्थांची विक्री, दरोडे व इतर गुन्ह्यांसाठीही आंतरराज्य गुन्हेगार बेळगावला येतात. या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे. मोटरसायकली चोरणाऱ्या काही तरुणांना एपीएमसी, टिळकवाडी, मारिहाळ पोलिसांनी अटक केली. यापैकी बहुतेक गुन्हेगार बेळगाव शहर व जिल्ह्यातील आहेत. उर्वरित गुन्ह्यात अटक झालेले व फरारी असलेले अनेक गुन्हेगार परराज्यातील आहेत.

जुलैमध्ये तीन मंदिरे फोडली

चोरट्यांनी बेळगाव तालुक्यातील मंदिरांना लक्ष्य बनविले आहे. चालू महिन्यात तीन ठिकाणी मंदिरांमध्ये चोऱ्या झाल्या आहेत. 3 जुलै रोजी बाळेकुंद्री खुर्द येथील महालक्ष्मी मंदिर फोडून चोरट्यांनी पाऊण लाखांचे दागिने पळविले आहेत. 16 जुलै रोजी हिरेबागेवाडी येथील कालिका देवस्थान फोडून 50 हजाराचे दागिने पळविण्यात आले आहेत. 27 जुलै रोजी मास्तमर्डी येथील लक्ष्मी मंदिरात एक लाखाच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. यावरून चोरट्यांनी मंदिरांना लक्ष्य बनविल्याचे दिसून येते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article