बेळगाव-मनगुरु एक्स्प्रेस पूर्ववत
16 पासून आठवड्यातून चार दिवस धावणार
बेळगाव : मागील काही महिन्यांपासून बंद असलेली बेळगाव-सिकंदराबाद-मनगुरु एक्स्प्रेस पुन्हा सुरू केली जाणार आहे. 16 ऑक्टोबर ते 30 मार्च दरम्यान आठवड्यातून चारवेळा रेल्वेसेवा मिळणार आहे. रविवार, मंगळवार, बुधवार व शनिवार असे चार दिवस रेल्वेसेवा उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांना मंत्रालय, हैदराबाद, सिकंदराबाद येथे ये-जा करणे सोयीचे होणार आहे.
मागील वर्षभरापासून सुरू असलेली बेळगाव-सिकंदराबाद एक्स्प्रेस तीन ते चार महिन्यांपूर्वी अचानक बंद करण्यात आली. यामुळे हैदराबाद-सिकंदराबाद या शहरांना जाण्यासाठी एकही रेल्वे उपलब्ध नव्हती. त्यामुळे ही एक्स्प्रेस पूर्ववत सुरू व्हावी यासाठी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांची भेट घेऊन विनंती केली होती.
आगामी दिवाळी, नाताळ, वर्षअखेर यांना जोडून पुन्हा एकदा बेळगाव-मनगुरु एक्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे. पूर्वी दररोज धावणारी ही एक्स्प्रेस आता मात्र आठवड्यातून चार दिवस धावणार आहे. पूर्वीप्रमाणेच दुपारी 12.30 वाजता ही एक्स्प्रेस बेळगावमधून निघणार आहे. त्यामुळे प्रवासी वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे.
जादा रेल्वेसेवांचा लाभ घेण्याचे आवाहन
दिवाळीसाठी हुबळी-योगनगरी-ऋषिकेश (उत्तराखंड) व विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळूर-भगत की कोटी या दरम्यान विशेष रेल्वे धावणार आहेत. योगनगरी ऋषिकेश एक्स्प्रेस 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक सोमवारी रात्री 8.30 वाजता हुबळी येथून निघणार आहे. तर भगत की कोटी ही एक्स्प्रेस 25 व 30 ऑक्टोबर रोजी बेंगळूर येथून सुटणार आहे. या दोन्ही एक्स्प्रेस हुबळी-धारवाड-लोंढा-बेळगाव-घटप्रभा-मिरज मार्गे धावणार असल्याने प्रवाशांनी या जादा रेल्वेचा लाभ घेण्याचे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेने केले आहे.